धाराशिव : आपल्या फायद्यासाठी काेण, काय करेल याचा नेम नाही. कुळ, सिलिंग तसेच इमान कार्यासनाच्या संचिका खाेट्या व बनावट कागदपत्रांधारे तयार करून त्या थेट जिल्हा कचेरीतील अभिलेख कक्षातून प्रमाणित करून घेतल्या. हा धक्कादायक प्रकार जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या चाैकशीतून समाेर आला. याप्रकरणी चाैघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा आनंदनगर पाेलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशिरा दाखल झाला.
कुळ, सिलिंग तसेच इनाम कार्यासनाच्या बनावट संचिका तयार करून त्या अभिलेख कक्षातून प्रमाणित केल्या जात आहेत. याच संचिकेच्या बनावट नकलांच्या आधारे शासनाच्या याेजनांचा लाभ घेतला जात असल्याच्या तक्रार जिल्हाधिकारी डाॅ. सचिन ओम्बासे यांच्याकडे येत हाेत्या. तक्रारींचा ओघ वाढल्यानंतर त्यांनी ३१ ऑगस्ट २०२२ ते १३ जून २०२३ या कालवधीतील संचिकांची चाैकशी करण्याचे आदेश दिले हाेते. पथकाने चाैकशी करून अहवाल सादर केला असता धक्कादायक प्रकार समाेर आला.
तेरखेडा येथील संताेष सिद्धलिंग कुंभार, काेळेवाडी येथील विवेकानंद पांडुरंग आकाेस्कर, चिखली येथील काशीनाथ हनुमंत भाेजने आणि भंडारवाडी येथील काशीनाथ भीमराज खटके यांनी कुळ, इनाम तसेच सिलिंग कार्यासनाच्या संचिका बनावट व खाेट्या कागदपत्रांच्या आधारे तयार केल्या. ही मंडळी एवढ्यावरच थांबली नाही तर त्या जिल्हा कचेरीतील अभिलेख कक्षातून प्रमाणित करून घेतल्या. याच संचिकेच्या नकलेचा आधार घेत त्यांनी शासकीय याेजनांचा लाभ उचलून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले. यानंतर जिल्हाधिकारी डाॅ. ओम्बासे यांच्या आदेशावरून नायब तहसीलदार चंद्रकांत शिंदे यांनी आनंदनगर पाेलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून बुधवारी रात्री उशिरा उपराेक्त चाैघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.