धाराशिव : डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय विक्रीस बंदी असलेल्या तब्बल १९ हजार नशाकारक गोळ्या उमरग्यातील एका मेडीकलमधून विक्री झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या झाडाझडतीत या गोळ्या सोलापूर येथून आल्याचे स्पष्ट झाले असले तरी विक्री नेमकी कोणाला केली, याचे रेकॉर्ड हाती लागलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात संबंधित मेडीकलचालकाविरुध्द आता पोलिस कारवाई करण्यात आली आहे.
नायट्रावेट हे औषध हे एंझायटी आजारात उपचारासाठी किंवा दारु सोडल्यानंतर रुग्णांना थरथरी येऊ नये, शांत झोप लागावी, याकरिता डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरले जाते. मात्र, उमरग्यात या औषधाचा नशेसाठी वापर केला जातो की काय असा प्रश्न अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर उभा राहिला आहे. शहरातील आर्या मेडीकलमधून शंभर- दोनशे नव्हे तर सुमारे १९ हजार गोळ्या विक्री झाल्या आहेत. यामध्ये नायट्रावेट ५ एमजीच्या ३ हजार तर १० एमजीच्या १६ हजार गोळ्यांचा समावेश आहे. जून २०२३ पासून अन्न औषध प्रशासनाचे पथक या मेडीकलवर पाळत ठेवून होते. या गोळ्या सोलापूरातून आल्या आहेत. मात्र, कोणत्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोण कोणत्या रुग्णांना विक्री केल्या, याचे रेकॉर्ड संबंधित मेडीकल चालकाकडे नाही. वेळोवेळी मागणी करुनही संबंधित रेकॉर्ड काही उपलब्ध झाले नाही. त्यामुळे या गोळ्या नेमक्या कोणत्या रुग्णांना दिल्या? कोणत्या वयोगटातील रुग्णांनी नेल्या? हे स्पष्ट होऊ न शकल्याने या गोळ्या नशेसाठी तर वापरल्या गेल्या नाहीत ना, असा प्रश्न आता उभा राहिला आहे. या प्रकरणी औषध निरीक्षक श्रीकांत पाटील यांच्याफिर्यादीवरुन मेडीकल चालक गणेश माने याच्याविरुध्द शुक्रवारी रात्री उशीरा उमरगा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.