- बाबुराव चव्हाण
उस्मानाबाद : लोक कोणत्या गोष्टीचा, कशासाठी वापर करतील याचा नेम नाही. कोरोनाला स्वत:पासून दूर ठेवायचे असेल तर वेळोवेळी हात सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. हीच गरज लक्षात घेऊन जिल्हाभरातील ग्रामपंचायतींनी घरोघरी जाऊन मोफत सॅनिटायझर पुरविले; परंतु सध्या या सॅनिटायझरचा हात निर्जंतुक करण्यासाठी कमी अन् पावसाळ्याचे दिवस असल्याने चूल पेटविण्यासाठी अधिक उपयोग होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मुंबई, पुणे यासारख्या शहरातून कोरोना विषाणू ग्रामीण भागातही पोहोचला. त्यामुळेच बाधितांच्या संख्येत झपाट्याने भर पडत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग यासह वेळोवेळी हात सॅनिटाईझ करण्याचा सल्ला दिला जात आहे. शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातील लोकातही हात सॅनिटाईझ करण्याचे प्रमाण वाढावे, या उद्देशाने ग्रामपंचायतींनी १४ व्या वित्त आयोगातून घरोघरी सॅनिटायझर तसेच मास्कही पुरविले. सुरूवातीला हात निर्जंतूक करण्यासाठीच सॅनिटायझरचा उपयोग केला जात होता. सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सकाळी पाणी तापवण्यासाठी अथवा स्वयंपाकासाठी चूल पेटविताना ग्रामीण भागातील गृहिणींच्या नाकीनऊ येते. पूर्वी रॉकेलच्या सहाय्याने चुली पेटविल्या जात; परंतु शहरांसोबतच ग्रामीण भागातही गॅस वापरकर्त्यांची संख्या वाढल्याने रॉकेल मिळणे बंद झाले.
रॉकेलप्रमाणे सॅनिटायझरही पेट घेते, ही खबर एका गृहिणीकडून दुसऱ्या गृहिणीकडे पोहोचली. अन् बघता-बघता सॅनिटायझरचा वापर हात निर्जंतूक करण्यासाठी कमी अन् चूल पेटविण्यासाठी अधिक सुरू झाला. हा प्रकार धोकादायक असून, वेळप्रसंगी जीवावरही बेतू शकतो. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सॅनिटायझर वापराबाबत जनजागृती करण्यात आली. त्याचप्रमाणे आता सॅनिटायझर चूल पेटविण्यासाठी वापरणे धोकादायक आहे, हेही ग्रामीण जनतेपर्यंत पोहोचविणे गरजेचे झाले आहे.
खवाभट्टी चालकांकडून सॅनिटायझर संकलितभूम, वाशी आदी तालुक्यांत खवाभट्ट्यांची संख्या मोठी आहे. चुलीप्रमाणे खवाभट्ट्याही पावसाळ्यात लवकर पेट धरत नाहीत. सध्या रॉकेलही मिळत नाही. त्यामुळे काही खवाभट्टी चालकांनी आपल्या संबंधातील लोकांकडून सॅनिटायझरच्या बाटल्या संकलित केल्या आहेत. हे सॅनिटायझर भट्टी पेटविण्यासाठी उपयोगात आणले जात आहे.
जीवावर बेतू शकते कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय गरजेनुसारच सॅनिटायझरचा वापर होणे गरजेचे आहे. ग्रामस्थांनी हात निर्जंतुक करण्यासाठीच त्याचा उपयोग करावा. चूल पेटविणे वा अन्य कारणांसाठी उपयोगात आणल्यास जिवावरही बेतू शकते. त्यामुळे या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून ग्रामपंचायतींनीही गावातील लोकांमध्ये जनजागृती करावी.-डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.