वाशी / पारगाव (जि. उस्मानाबाद) : विहिरीच्या काठावर बसलेल्या दोन 12 वर्षीय शाळकरी मुलांचा दरड कोसळल्याने त्याखाली दबून मृत्यू झाल्याची घटना बनगरवाडी येथे आज सकाळी घडली आहे. सुदैवाने विहिरीत पोहण्यास उतरलेली जवळपास 5 ते 6 मुले मात्र यातून बचावली आहेत.
वाशी तालुक्यातील बनगरवाडी गावालगतच काही शेतकऱ्यांची एक सामायिक विहीर आहे. या विहिरीत बऱ्यापैकी पाणी उपलब्ध असल्याने गावातील तरुण व शाळकरी मुले येथे नियमित पोहण्यासाठी जात होते. रविवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास जवळपास 5 ते 6 जण या विहिरीत पोहण्यासाठी उतरले होते. दरम्यान, करण पिंटू बोडके व विवेक अश्रूबा लांडगे हे दोघेही विहिरीच्या दरडीवर बसून आनंद घेत होते. मात्र, अचानक ही दरड विहिरीत ढासळली. त्यामुळे त्यावर बसलेले उपरोक्त दोघेही दरडीतील दगडासह विहिरीतील पाण्यात कोसळले. त्यांच्यावर दगडांचा ढीग साचल्याने या दोघांचाही बुडून जागीच मृत्यू झाला.
घटना समजताच गावातील नागरिक विहिरीच्या दिशेने धावले. तोपर्यंत वाशी ठाण्याचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख व तहसीलदार संदीप राजपुरेही घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तातडीने विहिरीतील पाणी मोटारीच्या साहाय्याने उपसून दगडाखाली दबलेल्या करण व विवेकचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. यानंतर घटनास्थळी त्यांच्या पालकांनी व नागरिकांनीही मोठा आक्रोश केला होता.