परंडा (उस्मानाबाद ) : टॅक्टर ट्रॉलीच्या टायरमध्ये हवा भरताना हवेच्या दाबाने टायरची डिक्स अचानक उडून तोंडावर आदळल्याने एका २६ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला़ ही घटना शुक्रवारी सकाळी परंडा तालुक्यातील आनाळा येथे घडली़ डिक्सचा मार लागल्याने मयत युवकाचा चेहना छिन्न विछिन्न झाला होता़
परंडा तालुक्यातील सोनारी येथील संभाजी उर्फ जिवन जगताप (वय-२६) याचा स्वत:चा ट्रॅक्टर असून, सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखान्याला ते ऊस वाहत होता़ जगताप हा स्वत: चालक म्हणून काम करत होता़ पांढरेवाडी येथील उमेश दुरुंदे, रमेश मोहीते यांच्या फंडातील ऊस भरुन गुरुवारी तो कारखान्यावर गेला होता़ शुक्रवारी सकाळी ऊस गव्हाणीत रिकामा करुन पांढरेवाडीच्या दिशेने तो जात होता़ आनाळ्याजवळ येताच ट्रॉलीच्या टायरमधील हवा कमी असल्याचे त्याच्या निदर्शनास आले़ त्याने आनाळा येथील पंक्चरच्या दुकानी हवा भरण्यासाठी टॅक्टर उभा केला.
जगताप हा स्वत: टायरमध्ये हवा भरत होता़ त्यावेळी हवेच्या दाबाने टायरच्या आतील डिक्स अचानक बाहेर येऊन जगताप याच्या चेहऱ्यावर आदळली़ डिक्सचा वेगात मार लागल्याने जगताप १५ फूट अंतरावर फेकला गेला. डिक्स चेहऱ्यावर आदळल्याने डोळ्यांच्या खालचा निम्मा भाग छिन्न विछिन्न झाला. जगताप याला तात्काळ परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधीक्षक डॉ़ संजय वाळके यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले़ दरम्यान, संभाजी जगताप याचा नुकताच साखरपुडा झाला होता. फेब्रुवारी महिन्यातील लग्न तारीख ठरली होती. विवाहपूर्वीच काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जगताप याच्या पाश्चात आई, वडील दोन भाऊ असा परिवार आहे. शवविच्छेदनानंतर सोनारी येथे जगताप यांच्यावर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.