उस्मानाबाद : सोलापूर जिल्ह्यातील भातंबरे (ता. बार्शी) येथे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन राज्य राखीव दलाच्या एका जवानाने बुधवारी रात्री साडेअकराच्या सुमारास मेहुण्यासह त्याच्या मित्रावर गोळीबार केल्याची ( SRP jawan killed brother-in-law's friend ) धक्कादायक घटना घडली आहे. त्यात उस्मानाबाद जिल्ह्यातील सापनाई येथील एकाचा मृत्यू झाला.
नितीन बाबूराव भोसकर (रा. सापनाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर वाद मिटवण्यास आलेला आरोपीचा चुलतभाऊ बालाजी महात्मे व काशीनाथ विश्वनाथ काळे (३५, रा.सापनई, ता. कळंब, जिल्हा उस्मानाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुरुबा महात्मे याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाचा जवान गुरुबा महात्मे हा मुंबई येथे कार्यरत आहे. त्याचे व त्याच्या पत्नीचे चारित्र्याच्या संशयावरून सतत भांडण होत होते. या प्रकारामुळे ते भातंबरे या त्यांच्या गावी आले होते. येथेही पती-पत्नीमध्ये भांडण सुरू झाल्याने मेहुणा अमर काकडे व त्यांचे मित्र नितीन भोसकर व काशीनाथ काळे (सर्व रा. सपनाई, ता. कळंब) असे तिघेजण अमरच्या बहिणीस घेऊन जाण्यास आले होते.
यादरम्यान गावातील प्रमोद वाघमोडे व सासू, सासरे, दीर यांच्यासमोर भांडण मिटविण्यासाठी चर्चा सुरू झाली होती. भांडणात तणाव वाढत गेल्याने आरोपी गुरुबाचा मेहुणा बहिणीस म्हणाला, मी तुला घेऊन जाण्यास आलो आहे, तुझी बॅग भर. असे म्हणताच गुरुबा महात्मे याने चिडून त्याच्याजवळील पिस्तूल काढून चारवेळा गोळीबार केला. या गोळीबारात नितीन भोसकर हे जागेवरच ठार झाले तर तंटा मिटविण्यास आलेले बालाजी महात्मे हे गोळीबारात जखमी झाले. यावेळी काशीनाथ काळे व अमर काकडे हे तेथून पळून जात असताना त्यांच्यावरही गोळीबार झाला. मात्र, त्यांना गोळी न लागल्याने ते यातून बालंबाल बचावले.
उसातून पळून जाताना आरोपीला पकडले...यावेळी फौजदार गटकूळ यांना रात्री एक वाजण्याच्या सुमारास आरोपी गुरुबा महात्मे हा उसातून निघून जाताना दिसल्याने त्यास ताब्यात घेतले. यावेळी आरोपीकडून चार फायर केलेले एक पिस्तूल व २६ जिवंत काडतूस जप्त केले आहेत. या घटनेचा तपास सहायक निरीक्षक महारुद्र परजणे करत आहेत.