अणदूर : तुळजापूर तालुक्यातील उमरगा (चि) येथील जागृत देवस्थान श्री संत नरसोबुवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी झाली. शेकडो वारकरी भक्तिरसात तल्लीन होऊन आनंद व्यक्त करीत होते. यानिमित्त तब्बल आठवडाभर विविध उपक्रमांचा ग्रामस्थ, भाविकांनी लाभ घेतला.
गतवर्षी कोरोनाच्या सावटाखाली साध्या व मोजक्या भक्तांच्या उपस्थितीत हा यात्रौत्सव पार पडला, परंतु यंदा कोरोना ओसरल्याने श्रीसंत नरसोबाची यात्रा उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने ३० ऑगस्ट ते ७ सप्टेंबर या कालावधीत हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहात हभप आप्पाराव जाधव, हभप कानोबा महाराज देहूकर, हभप दत्तात्रय महाराज उळेकर, हभप प्रकाश महाराज गोंधळवाडीकर, हभप प्रभाकर महाराज वाघचौरे, हभप बंडुपंथ महाराज देगांवकर, हभप मन्मथ महाराज उळेकर यांची कीर्तनसेवा तर हभप हरिप्रसाद महाराज देहूकर यांचे काल्याचे कीर्तन झाले. धार्मिक, समाजप्रबोधनाबरोबर सर्वांनी कोरोनापासून प्रतिबंध व काळजी घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी नरसोबुवाच्या पालखीची व लोहारवाडी येथील पालखीची गावातून वाजत-गाजत, आतषबाजी करत मिरवणूक काढण्यात आली. यात शेकडो वारकरी ‘ग्यानबा तुकाराम’च्या तालावर पाऊल खेळत भक्ती रसात तल्लीन झाल्याचे दिसून आले. या हरिनाम सप्ताहात चिवरी, हिप्परगा, फुलवाडी, चव्हाणवाडी, लोहारवाडी, सौंदर्गी आदी गावांतील भजनी मंडळांनी सेवा बजावली. महाप्रसादाने यात्रेची सांगता करण्यात आली.
यासाठी व्यवस्थापक व्यंकट सावंत, धनाजी सावंत, विजयकुमार सावंत, आण्णासाहेब कदम, कांत लोहार, विद्याधर शिरगीरे, मंदिर व्यवस्थापक प्रदीप पोतदार, गणेश पोतदार, एकनाथ लोहार, बालाजी सावंत, केरबा जाधव यांच्यासह श्रीसंत नरसोबुवा महाराज यात्रा कमिटी, ग्रामस्थांनी पुढाकार घेतला.