तुळजापूर : शारदीय नवरात्रातील मंगळवारी चौथ्या माळेनिमित्त (ललिता पंचमी) श्री तुळजाभवानी देवीची विशेष रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली.
तत्पूर्वी पहाटे श्री तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाले. यानंतर सकाळी सहा वाजता पंचामृत अभिषेक घाट होऊन श्री तुळजाभवानीस दुग्धअभिषेक व पंचामृत अभिषेक घालण्यात आले. यानंतर नैवेद्य, धुपारती, अंगारा हे दैनंदिन विधी झाल्यावर भोपे पुजारी सुरेश परमेश्वर, अतुल मलबा, समाधान परमेश्वर, संजय सोंजी, सचिन परमेश्वर या भोपी पुजारी बांधवांनी तुळजाभवानीची विशेष रथअलंकार महापूजा मांडली.
या पूजेचे वैशिष्ट्य म्हणजे श्री तुळजाभवानी माता सप्तअश्व असलेल्या रथात आरूढ होऊन महिषासुराशी युद्धाला सामोरे जाते. यावेळी तुळजाभवानीचा एका हातात चाबूक तर दुस-या हातात घोड्यांचा लगाम आहे. मस्तकी मळवटात माऊली गंध असून, केशरूपी अवतारात रौद्र रुपात श्री तुळजाभवानी आसुरावर चालून गेलेली पूजा मांडण्यात आली होती. या पूजेच्या वेळी महंत वाकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, व्यवस्थापक तहसीलदार, धार्मिक व्यवस्थापक, सेवेकरी व मंदिर कर्मचारी उपस्थित होते. अशाच प्रकारची पूजा शाकंभरी नवरात्रात मांडली जाते. परंतु त्यावेळी श्री तुळजाभवानी रथात बसून विश्व भ्रमण करते, अशी आख्यायिका सांगितली जाते.