लोकमत न्यूज नेटवर्क
वाशी : वाशी ते कळंब जाणारा रस्ता अगोदरच खड्डेमय झाला असून, त्यातच वळण रस्त्यावर दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली आहेत. त्यामुळे या मार्गावर अपघाताचा धोका वाढल्याने वाहनचालकांना अक्षरश: जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत.
वाशी ते कळंब रस्त्याच्या मजबुतीकरणाचे काम जवळपास तीन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. गतवर्षीही या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले होते. मात्र, खड्डे बुजवून काही महिने उलटतात तोच पुन्हा जागोजागी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. वाशीपासून जवळच असलेल्या धनगरवाड्यानजिकच्या वळणासह इतर ठिकाणी खड्डे पडले असून, यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकवत वाहने हाकावी लागत आहेत. खड्ड्यातून वाहन गेल्यास वाहनाचे नुकसान होत आहे. याबरोबरच वाहनातून दणके खात प्रवास करणाऱ्यांनाही मणक्याचे आजार जडू लागले आहेत. धनगरवाड्यानजिकच्या वळणावर रस्त्याच्या दुतर्फा झाडे वाढली आहेत. या वाढलेल्या झाडांमुळे व वळण रस्त्यामुळे समोरून येणारे वाहन दिसत नसल्याने अपघाताची शक्यता आहे. याठिकाणी वाढलेल्या झाडाच्या फांद्या तोडून रस्ता दिसेल, अशी व्यवस्था करण्यात यावी, अशीही मागणी या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणऱ्या शेतकऱ्यांमधून केली जात आहे.
याशिवाय वाशी येथील पारा चौक ते गणपती मंदिर व उंदरे वस्तीपर्यंतच्या रस्त्यावरील खड्डेही बुजवण्याकडेही दुर्लक्ष होत आहे. पावसाळ्यात मुरूम टाकून थातूरमातूर खड्डे बुजवण्याचे काम करण्यात आले होते. मात्र, परिस्थिती पुन्हा जैसे थे होत असल्यामुळे या रस्त्याचीही दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.
कोट.....
वाशी येथील पारा चौक ते उंदरे वस्तीपर्यंतचे खड्डे बुजवण्याचे काम स्थानिक गुत्तेदाराकडे आहे. येत्या आठवड्यात या ठिकाणचे खड्डे बुजवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. याशिवाय कळंबकडे जाणाऱ्या रस्त्यावरील खड्डे बुजवणे व वळण रस्त्यावरील झाडाच्या फांद्या तोडण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल.
- सतीश वायकर, उपविभागीय अभियंता, सा. बां. विभाग, वाशी