उमरगा : महामार्गावर पेट्रोल भरण्यासाठी गाडी वळवीत असताना कोराळ येथून निलंगा तालुक्यातील कासार शिर्शीकडे निघालेल्या बहीण-भावाच्या दुचाकीला भरधाव कारने जोराची धडक दिली. या अपघातात बहीण जागीच ठार झाली तर भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी राष्ट्रीय महामार्गावरील स्वामी पेट्रोल पंपासमोर घडली. यातील मृत बहिणीचा ६ मे रोजी विवाह होणार होता. परंतु, बोहल्यावर चढण्यापूर्वीच काळाने तिच्यावर घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
तालुक्यातील कोराळ येथील राहूल उर्फ कृष्णा राजेंद्र चोपडे (वय २४) हे पुणे येथील कंपनीत कामाला आहेत. त्यांची बहीण मोहिनी राजेंद्र चोपडे (वय २२) हिचे तिच्या मामाच्या मुलाशी कासार शिर्शी येथे लग्न जमले होते. ६ मे रोजी यांचा विवाह होणार होता. यासाठी राहुल हा पुण्याहून सुटी घेऊन आला होता. शनिवारी हे दोघे भाऊ-बहीण कासार शिर्शी येथील मावस भाऊ धोंडिबा जानकर यांच्या घरी डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी दुचाकीवरून (क्र एमएच १३/ बीजी २९९३) कोराळ येथून सकाळी निघाले होते. चौरस्ता येथे महामार्गावर स्वामी पेट्रोल पंपावर गाडीत पेट्रोल भरण्यासाठी गाडी वळवून घेत असताना दुसऱ्या मार्गावरून उमरग्याच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्या कारने (क्र. एमएच १७/ एजे ५००) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात मोहिनी ही जागेवर ठार झाली तर राहुल हा गंभीर जखमी झाला. यास तात्काळ उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलविण्यात आले आहे.