उस्मानाबाद - कौडगांव येथील औद्योगिक वसाहतीमध्ये नॅशनल टेक्नीकल टेक्स्टाईल मिशन अंतर्गत टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाेषणा केली हाेती. राज्य सरकारने दीड वर्षांपासून हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केलेला नाही. यासाठी आता भाजपाच्यावतीने स्वाक्षरी माेहीम राबविण्यात येणार आहे. जवळपास १० हजार नागरिकांच्या सह्या घेऊन निवेदन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती तुळजापूरचे भाजपा आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली.
उस्मानाबाद येथे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी बुथ अभियानांतर्गत आयोजित कार्यक्रमामध्ये या स्वाक्षरी मोहिमेची शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी आ. पाटील म्हणाले की, जिल्हयातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौडगाव औद्योगिक वसाहतीमध्ये टेक्निकल टेक्स्टाईल पार्क उभारण्याची घोषणा केली होती. या अनुषंगाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अहवाल सादर करण्याबाबत सूचित केले होते. के. पी. एम. जी. संस्थेच्या माध्यमातून एमआयडीसीने प्राथमिक अहवाल तयार करून घेतला आहे. परंतु, महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून हा विषय प्रलंबित राहिला आहे. राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्याकडे याबाबत बैठक घेण्याची मागणी अनेक वेळा केली. परंतु, त्यांची याबाबत अनास्था दिसून येते. केंद्र सरकारकडे हा प्रस्ताव मागील दीड वर्षांपासून सादर केलेला नाही. उस्मानाबादकरांसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी १० हजार नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार या माेहिमेला रविवारी सुरूवात करण्यात आली.
चाैकट...
उस्मानाबादसारख्या आकांक्षित जिल्हयात रोजगार निर्मिती करणारा प्रकल्प उभारल्यास येथील १० हजार पेक्षा जास्त युवकांना रोजगार मिळू शकतो. कौडगांव येथे राज्यातील पहिल्या तांत्रिक वस्त्र निर्मिती प्रकल्पाची घोषणा करून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबादकरांना मोठी भेट दिली होती. मात्र, राज्य सरकार या प्रकल्पाच्या अनुषंगाने उदासीन असल्याने प्रकल्प पुढे सरकला नाही.