खुदावाडी येथील सचिन मदन घोडके (२२) हा तरुण गेल्या सात वर्षांपासून पुण्यातील कंपनीत कामाला होता. सध्या त्याच्याकडे पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी होती. तर सचिन यांची सख्खी चुलत बहीण अर्चना व्यंकट कवडे (४५) याही तेथे कामगार म्हणून कार्यरत होत्या.
सॅनिटायझरसह अन्य केमिकलही या कंपनीमध्ये बनविले जात होते. सोमवारी सायंकाळी कंपनीस आग लागून भीषण दुर्घटना घडली. आगीची तीव्रता मोठी असल्याने या त्यात मृतांच्या शरीराचा अक्षरश: कोळसा झाला आहे. त्यामुळे ओळख पटविणे कठीण झाले आहे. डीएनए चाचणीच्या माध्यमातून तपासणी करून शव नातेवाईक यांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याचे सचिन यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, या घटनेमुळे खुदावाडी गावात मोठी हळहळ व्यक्त झाली.
मृत सचिन घोडके यांच्या पश्चात आई, वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. तर अर्चना कवडे यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.