उस्मानाबाद : कोरोना काळात सेवा बजावलेल्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी न करता कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्यात यावे, या मागणीसाठी कोविड कर्मचाऱ्यांच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
गतवर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या आजाराशी मुकाबला करण्यासाठी डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत होती. त्यामुळे आरोग्य जिल्हा प्रशासनाच्यावतीने ३ महिन्यांपुरती तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर, परिचारिका, वार्डबॉय, लॅब टेक्निशियन यांनी सेवा बजाविली. सेवा बजावत असताना अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागणही झाली होती. मात्र, या कर्मचाऱ्यांना रुग्णांची संख्या घटू लागताच कामावरून कमी करण्यात येत आहे. राज्यस्तरावरून कार्यमुक्त करण्याच्या सूचना जोपर्यंत प्राप्त होत नाहीत तोपर्यंत कोणत्याही कर्मचाऱ्यांना आपल्या स्तरावरून कार्यमुक्त करण्यात येऊ नये, ज्या कर्मचाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे त्यांना पुन्हा तातडीने नियुक्त देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विराेधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी महामारी योद्धा संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष दीपक लांडगे, कक्ष सेवक प्रदेश अध्यक्ष अजित कसबे, प्रदेश महिला संघटक कविता अबुज, बालाजी जानराव, कविता ताबारे, पुष्पांजली गायकवाड, प्रज्ञा सुरवसे, संघटक अजित पवार, विश्वजीत देशमुख, इम्रान सय्यद, अक्षय जाधवर, अक्षय लांडगे, प्रताप जगताप, नितीन आडे, अकबर इनामदार, अबोली कांबळे, महेश घाटे, एजाज शेख, महादेव घंटे, केवळ कांबळे, गायत्री माळी, शिवकरना संजगुरे, मोना शेंद्रे, आशा तवले, रेखा चाकरे, प्रियंका काळुंके, प्रगती काळुंके, प्रियंका वाघमारे आदी कर्मचारी उपस्थित होते.
या आहेत मागण्या....
कार्यमुक्त केलेल्या कंत्राटी अधिकारी, कर्मचाऱ्यांना पुन्हा तातडीने जैसे थे पदावर नियुक्त करण्यात यावे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध पदांवर नियुक्त केलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना नियमित करावे.
कोविड कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियान, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत नॉन कोविड, पोस्ट कोविड व तत्सम कर्तव्यावर आरोग्य विभागात रुजू करून घेण्यात यावे.
राज्यात आरोग्य विभागाच्यावतीने नवीन आरोग्य भरतीत कंत्राटी कोरोना कर्मचाऱ्यांना शैक्षणिक अर्हतेप्रमाणे परीक्षेच्या माध्यमातून कायम करण्यात यावे.
११ महिने कंत्राटी पद्धतीने नियुक्ती देण्यात यावी. कायमस्वरुपी सेवेत सामावून घ्यावे.