उस्मानाबाद : शहरातील एका खाजगी शाळेच्या विद्यार्थ्यांची ने-आण करणार्या बसच्या इंजिनमधून बुधवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास अचानक धूर निघाला. वीसपेक्षा अधिक विद्यार्थी घेऊन धावत असलेल्या बसला तरुणांनी वेळीच रोखून वद्यार्थ्यांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला आहे. दरम्यान, परिवहन विभागाने ही बस ताब्यात घेतली असून, कार्यवाही सुरु केली आहे.
उस्मानाबाद शहरातील एका खाजगी शाळेची बस (एमएच ३९-२४१८) सकाळी विद्यार्थ्यांना एकत्रित करीत होती. साडेआठ वाजेपर्यंत बसमध्ये वीसपेक्षा अधिक विद्यार्थी झाले होते. त्यांना घेऊन शहरातील काळा मारुती ते जिल्हाधिकारी निवासस्थान रोडवरुन बस धावत असताना इंजिनमधून धूर निघत असल्याचे काही सजग तरुणांच्या लक्षात आले. त्यांनी ही बस तातडीने रोखून विद्यार्थ्यांना बाहेर काढले. या घटनेची माहिती कळताच शहर ठाणे व वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचार्यांनी याठिकाणी धाव घेतली. त्यांनी जमलेली गर्दी बाजूला सारुन वाहतूक सुरळीत केली. दरम्यान, परिवहन विभागासही याची माहिती देण्यात आली होती. या विभागाचे काही अधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी बसची पाहणी करुन ती आपल्या ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरु केली आहे.
जुन्या वाहनांमुळे संताप...शहरातून विद्यार्थ्यांची वाहतूक करणार्या काही बसेस अतिशय जुनाट आहेत. त्यांचा कधीही धोका होऊ शकतो. बुधवारच्या घटनेत प्रसंगावधानाने वीसहून अधिक विद्यार्थी बालंबाल बचावले. बसच्या अवस्थेवरुन येथे जमलेले नागरिक संतापले होते. त्यांना पोलिसांनी वेळीच आवरले.
सकाळी घडलेल्या घटनेनंतर लागलीच परिवहन विभागाने बसची पाहणी केली. यावेळी इंजिनमधून धूर निघत असल्याचे दिसले. या वाहनाचे फिटनेस, नोंदणी या बाबींची तपासणी सुरु आहे. यानंतर पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. -गजानन नेरपगार, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी