उस्मानाबाद : नागपंचमी सणाला सापांची पूजा केली जाते त्याच सापाना मात्र इतर दिवशी नजरेस पडताच निर्दयीपणे मारले जाते. यामुळे दिवसेंदिवस सापांची संख्या कमी होत चालली आहे. सापांबद्दल आजही अनेक गैरसमज आहेत. सापाबद्दल जनजागृती होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात चारच विषारी साप असून इतर साप बिनविषारी आहेत. साप हा जीवसृष्टीतील महत्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे गरजेचे आहे.
मार्च-एप्रिल हा सापाच्या मिलनाचा काळा असतो. मे महिन्यात साप अंडी घालत असतो. सापाची अंडी उबवण्यासाठी ३० डिग्री अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची गरज असते. असे तापमान असलेल्या ठिकाणी साप अंडी सोडतो. यातून ५५ ते ६५ दिवसात म्हणजेच जून-जुलै महिन्यात पिल्ले निघण्याचा काळ असतो. या महिन्यात पावसामुळे सर्वत्र हिरवळ असते. त्यामुळे या काळात सर्वत्र साप दिसतात. जिल्ह्यात १५ प्रकारचे साप आढळून येतात. त्यामध्ये केवळ ४ विषारी साप तर दोन निम्न विषारी साप आहेत. तर उर्वरित बिनविषारी साप आहेत. सापाबद्दल असलेल्या भीतीचा फटका बिनविषारी सापांना बसतो. विषारी साप चावल्यानंतर प्रथमोपचार करून योग्य वेळेत उपचार मिळाल्यास जीव वाचू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पावसाळ्यात खबरदारी घेण्याचे आवाहन सर्पमित्रांनी केले आहे.
विषारी : जिल्ह्यात सापाच्या चार विषारी जाती आढळून येतात.
नाग (नागराज) जो फणा काढून उभा राहतो तो नाग, मण्यार काळपट नीळसर रंग, फुरसे या सापाची फूटपट्टी एवढी लांबी, शरीरावर वेलबट्टीसारखे नक्षीकाम असते. घोणस हा साप कुकरच्या शिट्टीचा आवाज काढतो, अंगावर साखळीसारखे काळ्या रंगाचे ठिपके असणाऱ्या रेषा असतात.
बिनविषारी
जिल्ह्यात मांजऱ्या व हरणटोळ हे दोन साप निम्नविषारी साप आढळून येतात. धामण, कड्या, तस्कर, गवत्या, पांदीवड, नानीटी हे साप बिनविषारी आहेत. मात्र, नागरिक साप म्हटले की सर्वच साप विषारी समजून त्यांना इजा पोहोचवित असतात. साप हे जीवसृष्टीतील महत्त्वाचा असल्याने त्याचे संवर्धन करणे महत्त्वाचे आहे.
साप आढळला तर...
शेतात तसेच रस्त्याला साप आढळून आला तर नागरिकांनी त्यास इजा न पोहोचविता जाऊ द्यावे.
घरात साप आढळून आला तर त्याच्यापासून ५ ते ६ फूट अंतर राखून उभे राहावे.
घोणस जातीच्या सापाला डिवचल्यानंतर तो मानवावर हल्ला करू शकतो.
घराच्या परिसरात नाग आढळून आला तर ज्या ठिकाणाहून साप येण्याची शक्यता वाटते त्या ठिकाणी रॉकेल आणि पाणी शिंपडावे. साप चावल्यानंतर नागरिकांचा भीती पोटीच मृत्यू होता. त्यामुळे साप चावल्यानंतर भीती न बाळगता रुग्णालय गाठणे सोयीचे ठरते.
साप तर शेतकऱ्यांचा मित्र
जिल्ह्यात अनेकांचा व्यवसाय शेतीआधारीत आहेत. शेतीवरच बहुतांश व्यक्तींची उपजिविका भागते. शेतातील पिकांचे उदीर मोठ्या प्रमाणात नुकसान करीत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागतो. मात्र, सापाचे खाद्य उदीर असल्याने शेतात सापांचे वास्तव्य असल्यास उदीरापासून धान्याचे संरक्षण होते.
कोट...
साप तिन्ही ऋतूत आढळून येतात. नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चार विषारी प्रजाती आहेत. पावसाळ्याच्या दिवसात शेतात काम करताना नागरिकांनी खबरदारी बाळगावी. तसेच मानवी वस्तीत साप आढळून आल्यानंतर त्यास इजा न पोहोचविता सर्पमित्रांशी संपर्क साधावा. दूध हे सापाचे अन्न नसल्यामुळे सापला दूध पाजू नये.
सुरज मस्के, सर्पमित्र