कळंब : गेल्या तीन वर्षापासून वळण (बायपास) रस्त्याचे काम रखडले असून, शहरातील अनेक कामाची मुदत संपलेली असतानाही ती पूर्ण झालेले नाहीत. त्यामुळे ही कामे तात्क़ाळ सुरू न केल्यास रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
याबाबत मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शहराच्या बाहेर जाणाऱ्या वळण रस्त्याचे (बायपास) काम गेल्या तीन वर्षापासून रखडलेले आहे. या कामाची मुदत संपलेली असतानाही काम बंद असून, याकडे प्रशासन, पदाधिकारी यांचे दुर्लक्ष आहे. हे काम करणाऱ्या गुत्तेदार एजन्सीची गिनिज बुकात नोंद होण्यासाठी न. प.ने शिफारस करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. शहरात अनेक कामे अर्धवट असून, ती तात्काळ पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा याच रस्त्यावर झोपून आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनावर नगरसेवक सतीश टोणगे, चर्मकार युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष विकास कदम, मारुती माने, राजाभाऊ गरड, पोपट जगताप, सोमनाथ वाघमारे, महेश दळवी, बाबूराव सुरवसे, हिम्मत मंडाळे, बालाजी देशमाने यांच्या सह्या आहेत.