भूम : येथील एस. टी. बस आगारात अनेक समस्या असून, याकडे आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे याकडे लक्ष देऊन समस्या सोडविण्याची मागणी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे नामदेव नागरगोजे यांनी विभाग नियंत्रकांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून येथील कर्मचाऱ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. आगारातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली असून, पाण्याअभावी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय, स्वच्छतागृहांच्या दरवाजांचीही मोडतोड झाली आहे. रातराणी मुंबई, बोरवलीच्या तिसऱ्या दिवसाच्या फेऱ्या या कर्मचाऱ्यांना गैरसोयीच्या ठरत असल्याचे सांगत मुंबई बेस्ट वाहतुकीसाठी गंभीर आजार असलेल्या कर्मचाऱ्यांना पाठवू नये, असे परिपत्रक असतानाही याची अंमलबजावणी होत नाही. कोविड १९ च्या लाॅकडाऊन काळातील ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना वाहतूक बंद असल्यामुळे लॉकडाऊन एलडीपी हजेरी देण्याचे आदेश आहेत. असे असतानाही रजेचा अर्ज नसणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्तीने रजा टाकायला लावून वेतनापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे त्यांचे वेतन तात्काळ द्यावे, अशी मागणी नागरगोजे यांनी या निवेदनात केली आहे.