धारारशिव : सध्या शिवसेनेच्या वतीने संवाद दाैरा सुरू करण्यात आला आहे. गावाेगावी शिवसैनिकांकडून जंगी स्वागत केले जात आहे. कडक उन्ह असाे की रात्रीची थंडी, सभांना माेठी गर्दी हाेत आहे. हे सर्व चित्र पाहिल्यानंतर मराठवाड्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील कवडट शिवसैनिक पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या पाठीशी खंबीर उभा असल्याचं दिसतं, असं ठाम मत शिवसेना नेते तथा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.
धाराशिव येथे शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषदेत ते बाेलत हाेते. यावेळी सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, नितीन शेरखाने आदींची उपस्थिती हाेती. खा. राऊत म्हणाले, काही लाेकं घाबरून पळून गेली. मात्र, कडवट शिवसैनिक जागेवर आहे. ते संवाद दाैऱ्यातून प्रकर्षाने दिसून येत आहे. नार्वेकर यांच्या लवादाने दिलेल्या निर्णयाविराेधात शिवसेना सर्वाेच्च न्यायालयात गेली आहे. सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी लवादाचा निर्णय न्यायालयाच्या निर्णयाशी विसंगत नाही का, अशा शब्दात शंका उपस्थित केली आहे. त्यामुळे आम्हाला सर्वाेच्च न्यायालयाकडून माेठी आशा आहे. आणि त्याच आशेच्या किरणामुळे आम्हीही आशावादी असून सर्वाेच्च न्यायालयाकडून निश्चित आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
जागा वाटपाबाबत विचारले असता, ज्यांचा उमेदवार जिथे प्रबळ, ती जागा त्या पक्षाला असं आमचं सरळ-सरळ धाेरण आहे. जागा वाटप अत्यंत चांगल्या पद्धतीने पुढे जात आहे. लवकरच महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे), राष्ट्रवादी (शरद पवार), काॅंग्रेस, वंचित बहुजन आघाडी व अन्य घटक पक्ष किती जागा लढविणार हे जाहीर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.