पारगाव : वाशी तालुक्यातील पारगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्र या राष्ट्रीयीकृत बँक शाखेत कधी सर्व्हर डाऊन, कधी वीज गायब तर कधी अन्य तांत्रिक बिघाडामुळे सातत्याने कामकाज बंद राहत आहे. यामुळे परिसरातील व्यापारी व शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
या बँक शाखेत पारगावसह हातोला, पिंपळगाव, जेबा, ब्रह्मगाव, पांगरी, रुई, जनकापूर, गिरवली, विजोरा, सोन्नेवाडी येथील ग्राहकांची खाती आहेत. सध्या पेरणीचे दिवस असल्याने शेतकरी खते, बियाण्यासाठी आपल्या खात्यावरील पैसे काढण्यासाठी बँकेत येत आहेत. मात्र, या ठिकाणी आल्यानंतर दारावर ‘तांत्रिक बिघाडामुळे कामकाज बंद’ असा फलक लावलेला असतो. हा तांत्रिक बिघाड सलग दोन-दोन दिवस दुरूस्त होत नसल्याने ग्राहकांची मोठी आर्थिक कोंडी होते.
अगोदरच लॉकडाऊनमुळे आर्थिक घडी विस्कटली आहे. आता हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येऊ पाहत असतानाच बँकेतील तांत्रिक अडचणींचा फटका बसत आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांची देखील गैरसोय होत असल्याचे खवा व्यापारी संजय गवळी यांनी सांगितले.