धाराशिव : वेळा अमावस्येसाठी शेतात गेल्यावर घरी कोणी नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी धाराशिव तालुक्यातील बामणी येथील एका घराचे कुलूप तोडून रोख १ लाख ८० हजार, सोन्याच्या दागिन्यांसह जवळपास अडीच लाखांचा ऐवज पळविल्याची घटना घडली. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, धाराशिव तालुक्यातील बामणी येथील फिर्यादी गोवर्धन गणपती डोंगरे (वय ५१) हे वेळाअमावस्या असल्यामुळे गुरूवारी सकाळी घराला कुलूप लावून पत्नीच्या वडिलांच्या विठ्ठलवाडी शिवारातील शेतात गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी कुलूप तोडून घरात प्रवेश केला. स्वयंपाक घरात ठेवलेल्या लोखंडी कपाटातील रोख रक्कम १ लाख ८० हजार रूपये व पत्नीचे मनी, मंगळसूत्र, फुले, झुमके असा जवळपास दोन तोळ्याहून अधिक वजनाचे दागिनेही लंपास केले. शेतातील सोयाबीनची विक्री करून त्यांनी १ लाख ८० हजार रूपये घरात आणून ठेवले होते. दागिने आणि रोख रक्कम एकाच कपाटात ठेवली होती. वेळाअमावस्येसाठी पत्नीसह बाहेरगावी गेल्यावर इकडे चोरट्यांनी कुलूप तोडून डल्ला मारला. याबाबत गोवर्धन डोंगरे यांनी बेंबळी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोयाबीन विकून ठेवली होती रक्कम...शेतकरी गोवर्धन डोंगरे यांनी शेतातील सोयाबीन विकून १ लाख ८० हजार रूपये घरात ठेवले होते. चोरट्यांनी घरात कोणी नसल्याचा फायदा घेत रोख रक्कम व त्यांच्या पत्नीचे मणीमंगळसूत्र, फुले, झुबे जवळपास २० ग्रॅम वजनाचे दागिने लंपास केले. याप्रकरणी बेंबळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल होताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील तपास बेंबळी पोलीस करीत आहेत.