तामलवाडी : तुळजापूर तालुक्यातील काटी मंडळ कृषी कार्यालयाअंतर्गत २२ गावात खरीप हंगामातील २४ हजार हेक्टर क्षेत्रापैकी १८ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला असून, सध्या ही पिके जोमदार आहेत. पिकाच्या अंतर्गत मशागतीच्या कामात बळीराजा गुंतल्याचे दिसून येत आहे.
काटी मंडळात मृग नक्षत्रात पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला प्रारंभ केला. परंतु, काही शेतकऱ्यांच्या पेरण्या जमिनीतील ओल संपल्याने खोळंबल्या होत्या. या मंडळात १८ हजार क्षेत्रावर सोयाबीनचा सर्वाधिक पेरा झाला तर उर्वरित ६ हजार हेक्टर क्षेत्रावर उडीद, मूग, तूर, मका आदी पिकाचा पेरा झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.
पेरणीनंतर पावसाने २० दिवसाचा खंड दिल्याने उगवलेली पिके माना टाकू लागली होती. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या पुनर्वसू नक्षत्राच्या पावसाने दिलासा मिळाला आहे. सध्या या मंडळात १८ हजार हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन पिकाच्या अंतर्गत मशागतीची कामे सुरू झाली आहेत. कोळपणी, खुरपणी आदी कामात बळीराजा गुंतला आहे. खुरपणीला दिवसाकाठी २५० मजुरी महिला मजुरांना द्यावी लागत आहे. दुसरीकडे खते, बियाणाची देखील दरवाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे.
चौकट
सोयाबीनचा उच्चांक
काटी मंडळातील जवळपास ८० टक्के क्षेत्रावर यंदा सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. ५ टक्के पेरणी पावसाअभावी थांबली होती. मात्र, दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसानंतर तीही आता सुरू झाली आहे. बाजारात सोयाबीनचा भाव वाढल्याने यंदा शेतकरी सोयाबीन पिकाकडे वळला आहे.
- आनंद पाटील, मंडळ कृषी अधिकारी, काटी
चौकट
पीक विम्याकडे फिरविली पाठ
गतवर्षी खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद, मूग आदी पिकाचे परतीच्या पावसाने ८० टक्के नुकसान झाले. परंतु, शेतकऱ्यांना सरसकट पीक विमा देण्यास विमा कंपनीने टाळाटाळ केली. त्यामुळे यंदा खरीप विमा भरण्यास शेतकऱ्यांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. पीक विमा भरण्यासाठी शेवटचे पाच दिवस शिल्लक असताना पीक विम्याबाबत वातावरण सकारात्मक नसल्याचे पहावयास मिळत आहे.