कळंब : शेतात पिकणारं ‘पिवळं सोनं’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोयाबीनची येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मोठी आवक नोंदली गेली असून, मागच्या तीन महिन्यात मोंढ्यात आलेल्या सोयाबीनने ‘लाखभर’ क्विंटलचा पल्ला पार केला आहे.
कळंब येथील कृषि उत्पन्न बाजार समिती जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषि बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. विस्तीर्ण अशा २५ एकर क्षेत्रात असलेल्या येथील मोंढ्यात खरीप हंगामाचा काढणी हंगाम सुरू होताच नव्या शेतमालाची मोठी आवक चालू होते. यातून दररोज कोट्यावधी रूपयाचे खरेदी-विक्री व्यवहार होतात.
लगतच्या केज, वाशी तालुक्यातील अनेक गावचे शेतकरीही आपला शेतमाल कळंबच्या मोंढ्यात विक्रीसाठी आणतात. यामुळेच खरीप हंगाम आटोपता येताच मोंढ्याचा हंगामही जोम धरतो. यातही सोयाबीनचे कोठार अशी नवी ओळख असलेल्या कळंब तालुक्यातील सोयाबीन बाजारात येताच संपूर्ण बाजारपेठेला एक नवी झळाळी येते.
गावोगावी फडीवाल्यांचं समांतर मार्केट उभे राहिले असल्याने व यातून आवक त्या-त्या गावात थोपवली जात असली तरी कळंबच्या मोंढ्यातही दखलपात्र आवक व उलाढाल होत आहे हे विशेेष. यंदाही अशीच स्थिती दिसून आली असून, सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धापासून मोंढ्यात नव्या मालाची तब्बल एक लाख पाच हजार क्विंटलची आवक झाली आहे.
चौकट....
ऑक्टोबरमध्ये उच्चांकी आवक
कळंब येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात चालू हंगामात सप्टेंबर एन्डपासून नव्या मालाची आवक सुरू झाली. यात पुढे सातत्याने वृद्धी होत गेली. यातही ऑक्टोबर महिन्यात उच्चांकी अशी ४७ हजार २०६ क्विंटलची आवक झाली होती. यानंतर नोव्हेंबर महिन्यात ३४ हजार ९५४ क्विंटल तर चालू डिसेंबर महिन्यात १८ हजाराच्या आसपास सोयाबीनची आवक झाली आहे. यामुळे चालु हंगामात नव्या सोयाबीनची आवक लाखभर क्विंटलचा पल्ला पार करून गेली आहे.
चालू वर्षात सव्वा लाख क्विंटल
यंदा तालुक्यात सोयाबीनच्या पेऱ्याने पन्नास हजार हेक्टरचा टप्पा पार करत नवा विक्रम नोंदवला होता. मात्र, नंतर काही भागात लहरी निसर्ग व अतिवृष्टीनं पिकाला झपका दिला. यामुळे अनेक गावात पिकांचे नुकसान झाले होते. अशी स्थिती नसती तर यंदा वाढत्या क्षेत्रामुळे आहे त्यापेक्षाही जास्त आवक नोंदली गेली असती. यास्थितीत यंदा लगतच्या तालुक्यातील मालही मोंढ्यात दाखल झाला. यंदाच्या एप्रिल ते डिसेंबर या काळातील सोयाबीनची आवक सव्वा लाख क्विंटल एवढी असून, यात २० हजार क्विंटल जुनी तर एक लाख क्विंटल नवी आवक आहे.
दरातील फरक न पचनारा
ग्रामीण भागातील अनेक गावात खाजगी सोयाबीन खरेदी केंद्र सुरु झाली आहेत. याठिकाणी मिळणारा दर हा कळंब कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मिळणाऱ्या दरापेक्षा शंभर ते अडिचशे रूपयाने जास्त असतो. बाजार समिती कायद्यान्वये खुले सौदे असल्याने व एकाधिकारशाही नसल्याने मोंढ्यात गावाच्या फडीपेक्षा जास्त दर मिळणे अपेक्षित असताना मोंढ्यात गावच्या फडीपेक्षा कमी दर का मिळतो, याचे आत्मपरीक्षण बाजार समिती व मोंढ्यातील व्यापाऱ्यांनी करणे गरजेचं आहे. दरातील ही ‘तूट’ शेतकरी मात्र ‘लूट’ समजत असून त्यांचे मोंढ्याकडील पाय दुसरीकडं वळत चालले आहेत हे मात्र निश्चित.
फोटो...
कळंब येथील एका आडत दुकानात गुरूवारी सौदे सुरू असतानाचे छायाचित्र