कळंब : तालुक्यातील बहुतांश भागात यंदाही मानाच्या अशा मृग नक्षत्रातील पेरणीचा योग जुळून आला असून, झालेल्या पेरणीत सोयाबीनचा वरचष्मा कायम दिसून येत आहे. पेरणीची अंतिम आकडेवारी हाती आली नसली तरी सोयाबीनच्या क्षेत्राने पन्नास हजार हेक्टरचा टप्पा ओलांडला आहे. कळंब तालुक्यातील शेतकऱ्यांचा खरीप हा प्रमुख हंगाम आहे. तालुक्यातील एकूण लागवड खालील लाखभर हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ७४ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचा पेरा होतो. यात प्रामुख्याने सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग आदी पिके घेतली जातात. मागच्या दहा वर्षात खरिपाच्या एकूण सर्वसाधारण क्षेत्रात जसे बदल नोंदवले गेले आहेत तसेच बदल पीक पद्धतीतही दृष्टीपथात आले आहेत. यात पिकांच्या क्षेत्रासंदर्भात महसूल मंडळ निहाय दिसून येणारे बदल आता दूर झाले असून सर्वच मंडळात सोयाबीन पिकाचे वर्चस्व दिसून येत आहे.
यास्थितीत साधारणतः जूनच्या पहिल्या पंधरवड्यात होणाऱ्या मृग नक्षत्राच्या दमदार पावसानंतर शेतकरी पेरणीस प्रारंभ करत असतात. यंदाही मृग नक्षत्राचे आगमन जोमदार झाले. यामुळे साधारणतः जूनच्या मध्यात पेरण्यांनी वेग पकडला. तालुक्यातील बोटावर मोजण्या इतपत शिवाराचा अपवाद वगळता बहुतांश भागात यामुळे पेरण्या मार्गी लागल्या आहेत. यातच गतवर्षीच्या उगवण क्षमतेचा कटू अनुभव पाठीशी असलेल्या शेतकऱ्यांना यंदा चांगले ‘जर्मिनेशन’ मिळाले आहे. यामुळे आत्ता पिकाच्या वाढीकडे लक्ष केंद्रित केले जात आहे. तालुक्यात एकूण ७५ हजार हेक्टर क्षेत्र खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र आहे. यापैकी आजवर पन्नास हजार हेक्टर क्षेत्रात सोयाबीन पेरणी झाली आगे. सद्यस्थितीत पेरणीची अंतिम आकडेवारी हाती आलेली नाही. यात पुन्हा वाढ होण्याची अपेक्षा आहे. एकूणच पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रात सोयाबीनचा वाटा मोठा आहे.
चौकट...
यांत्रिक वापर : एका झटक्यात आटोपली पेरणी....
१० जूननंतर काही भागात चांगला पाऊस झाला. यात यंदा जवळपास ९५ टक्के क्षेत्रावर ट्रॅक्टर चलित यांत्रिक पेरणी यंत्राच्या साह्याने पेरणी झाली. गावोगावी याची मुबलक उपलब्धता असल्याने पेरणी अवघ्या आठवडाभरात आटोपती झाली आहे. यातही अनेक गावात बीबीएफ यंत्राचा वापर झाला आहे. शेतकऱ्यांनी घरगुती बियाणे इतपत कंपन्यांच्या बियाण्यांना पसंती दिली आहे.
अन्नधान्याची पेर नाममात्र...
तालुक्यातील ७४ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रातील १९ हजार हेक्टर क्षेत्रावर अन्नधान्य प्रवर्गातील पिकांची पेर होत असते. यात भात ज्वारी, बाजरी, मका या तृणधान्याचे ७ हजार हेक्टर तर तूर, उडीद, मूग या कडधान्यांचे १२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. असे असताना यंदा अन्नधान्याची केवळ अडीच हजार हेक्टरवर पेर झाली असून, यात तृणधान्य ४०५ हेक्टर तर कडधान्य क्षेत्र दोन हजार हेक्टर एवढे अदखलपात्र नोंदले आहे.