तुळजापूर (जि. धाराशिव) : ज्येष्ठा गौरीपूजन अर्थात महालक्ष्मी पूजनानिमित्त शुक्रवारी श्री तुळजाभवानी देवीची विशेष सुवर्ण अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. या महापूजेचे भाविकांबरोबरच हजारो सुहासिनी महिलांनी दर्शन घेतले.
शुक्रवारी पहाटे तुळजाभवानीचे चरण तीर्थ झाल्यानंतर नित्योपचार पंचामृत अभिषेक महापूजा पार पडली. या पूजेनंतर भोपे पुजारी यांनी तुळजाभवानी देवीस दैनंदिन नैवेद्य दाखविला. आरती, धुपारती व अंगारा हे धार्मिक विधीनंतर गौरीपूजनानिमित्त देवीला पारंपरिक पद्धतीचा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला.
तत्पूर्वी पैठणी महावस्त्र घालून महंत व भोपे पुजारी यांनी शिवकालीन सुवर्ण अलंकार तुळजाभवानीस घातले. शिवकालीन सुवर्ण अलंकार हे तुळजाभवानीला विशेष दिनीच घातले जातात. दरम्यान, या विशेष सुवर्ण अलंकार महापूजेचे हजारो भाविकांनी आई राजा उदे-उदेच्या गजरात दर्शन घेतले. गौरीपूजनानिमित्त शहरवासीयांनी तुळजाभवानीला नैवेद्य दाखवण्यासाठी मोठी गर्दी केली होती.