कळंब - खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी कळंब येथील कोविड सेंटरला भेट देत रुग्णांची आस्थेने चौकशी केली. तर स्वच्छता, ऑनड्युटी डॉक्टर व रुग्णवाहिका यासंदर्भात चांगलीच झाडाझडती घेतली. लोकांना सेवा मिळाली पाहिजे, त्यांचे जीव वाचले पाहिजेत, असे यावेळी उभयतांनी आरोग्य यंत्रणेला बजावले.
खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील यांनी सोमवारी रात्री अचानक कळंब येथील उपजिल्हा रुग्णालय व आयटीआय येथील कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी त्यांनी दाखल रुग्ण, ऑक्सिजन उपलब्धता, त्याचा वापर, इंजेक्शन आदी संदर्भात माहिती जाणून घेतली.
यानंतर थेट उपचार घेत असलेल्या रुग्णांची आस्थेने चौकशी केली. डॉक्टर, कर्मचारी असतात का? राऊंड होतात का? याची चौकशी केली. याशिवाय स्वच्छता, औषधी यांची पाहणी केली. यावेळी दोन्ही कोविड सेंटरवर अस्वच्छता आढळून आल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य हर्षद अंबुरे, सुशील तिर्थकर, सचिन काळे, बंडू यादव आदी उपस्थित होते.
चौकट...
रुग्णवाहिका दिलीय कशाला?
यावेळी आ. कैलास पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका दिलेली आहे. ती रुग्णवाहिका गरजू रुग्णांना उपलब्ध करून दिली जात नाही? अशा तक्रारी आल्याचे सांगत तुम्हाला रुग्णवाहिका कशाला दिली आहे, लोकांना रुग्णवाहिका असताना का उपलब्ध करून दिली जात नाही, असा सवाल करत खा. राजेनिंबाळकर यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली.
ऑनड्युटी कोण आहे?
यावेळी आ. कैलास पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयात आता ऑनड्यूटी कोण डॉक्टर आहेत? अशी विचारणा केली. यानंतर डॉक्टर किती कार्यरत आहेत, कोरोनामुक्त झाल्यानंतर रूजू झाले का? याची चौकशी केली. यानंतर तातडीने ऑनड्युटी डॉक्टरांचा चार्ट दर्शनी भागात लावा, असे आ. पाटील यांनी सुनावले.