कळंब : खामगाव-पंढरपूर रस्त्याच्या काम करणाऱ्या कंपनीचा येरमाळा येथील आणखी काही शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शनिवारी झालेल्या पावसानंतर रखडलेल्या ओढ्यावरील पुलाच्या कामामुळे शेतातील उभ्या पिकात पावसाच्या तळे साचल्याने मोठे नुकसान झाले.
खामगाव-पंढरपूर या महत्त्वाकांक्षी राष्ट्रीय महामार्गाचे दोन वर्षाची मुदत असलेले काम गत चार वर्षांपासून कायम प्रगतीपथावर आहे. कंपनीच्या धिम्या व बेफिकीर कारभाराचा यापूर्वी अनेक शेतकऱ्यांसह नागरिकांनादेखील त्रास सहन करावा लागला आहे. असे असतानाही प्रशासन, रस्ते विकास महामंडळ विशेष ‘मेहरबान’ असलेल्या या कंपनीच्या कामाकडे कानाडोळा करत आहे.
या स्थितीत शनिवारी सायंकाळच्या सुमारास येरमाळा परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे कंपनीच्या कामाचे ढिसाळ नियोजन पुन्हा समोर आले. येरमाळा परिसरातील एका ओढ्यावरील पुलाचे काम कंपनीने सुरू केले आहे. यासाठी त्या ओढ्याचा नैसर्गिक प्रवाह मार्ग अडवला गेला आहे. यामुळे जोरदार झालेल्या पावसाचे पाणी अडवले जाऊन लगतच्या शेतात घुसले. यामुळे येरमाळा येथील गणेश तुकाराम शिंदे, राजश्री चंद्रकांत शिंदे यांच्या शेतजमिनीचे मोठे नुकसान झाले. उसाच्या पिकात पाण्याचे तळे साचले असून, शेतातील बोअरवेल्सला हानी पोहचली आहे. मोठ्या पावसाने ओढ्यास आलेले पाणी शेतात वळते झाले. यामुळे कसदार मृदा वाहून गेली आहे. कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे शेतकऱ्यांना हा फटका बसला आहे.
चौकट...
नुकसान भरपाई द्या
खामगाव-पंढरपूर हायवेचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीच्या चुकीच्या नियोजनामुळे येरमाळा येथील शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. याची प्रशासन, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी पाहणी करावी व शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गणेश शिंदे यांनी केली आहे.
कंपनीवर वॉच कोणाचा?
खामगाव-पंढरपूर रस्त्याच्या कळंब ते येरमाळा या तालुका हद्दीतील कामाचे रडगाणे चार वर्षांपासून सुरू आहे. आपल्या मनावरच काम ते पण कधी सुरू अन् कधी बंद, अशी आजवर स्थिती असलेल्या या कामाचा दर्जा संशोधनाचा विषय आहे. असे असतानाच वारंवार लगतच्या शेतकऱ्यांना झळ पोहोचविणाऱ्या यांच्या कामाबद्दल कोणी जाब कसा विचारत नाही, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.