उस्मानाबाद : मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद घेण्यात येणार आहे. परिषदेसाठी राज्यभरातील मुस्लिम समाजाचे आजी-माजी खासदार, आमदारांना आमंत्रित करण्यात आले आहे, अशी माहिती समितीच्या वतीने आज येथील शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
शासनाने वेळोवेळी नेमलेल्या अभ्यासगटांनी मुस्लिम समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आरक्षणाची शिफारस केली आहे. काँग्रेस-राष्टÑवादी आघाडी सरकारने मराठा समाजासोबतच मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण मान्य केले होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर नोकरीतील आरक्षणाला न्यायालयाने स्थगिती दिली. परंतु, शिक्षणातील आरक्षण मान्य केले होते. दरम्यान, विद्यमान सरकारने तातडीने योग्य ती पाऊले उचलली नाहीत. आता तर हे सरकार आरक्षणाबाबत ‘ब्र’ शब्दही काढत नाही. आरक्षणाच्या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात आंदोलने करण्यात आली. परंतु, त्याचा सरकारवर काहीच परिणाम झालेला नाही, असा आरोप संघर्ष समितीचे शेख मसूद इस्माईल यांनी पत्रकार परिषदेत केला.
दरम्यान, आरक्षणाची लढाई अधिक मजबूत करण्याच्या हेतुने मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीच्या वतीने १ सप्टेंबर रोजी उस्मानाबादेत राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण परिषद घेण्यात येणार आहे. या परिषदेसाठी खासदार हुसेन दलवाई, नवाब मलिक, मो. आरेफ नसीम खान, माजीद मेमन, बाबाजानी दुर्राणी, मौलाना नदीम, आमदार अब्दुल सत्तार, इम्तियाज जलील, अबु आसीम आजमी, असलम शेख यांच्यासह राज्यातील मुस्लिम समाजाचे आजी-माजी खासदार, आमदारांना आमंत्रित केले आहे. तसेच आरक्षणाच्या मागणीसाठी संघर्ष करणाऱ्या राज्यभरातील विविध मुस्लिम संघटनांचे पाचशेवर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे परिषदेचे स्वागताध्यक्ष असतील, असे मसूद शेख म्हणाले. पत्रकार परिषदेला संघर्ष समितीचे शेख इस्माईल, इलियास पिरजादे, खादर खान, शमशोद्दीन मशायक, सय्यद खलील, नगरसेवक खलिफा कुरेशी, बाबा मुजावर, आसद पठाण, शेख आयाज, अन्वर शेख, मन्नान काझी, बिलाल तांबोळी आदींची उपस्थिती होती.