कळंब : संपूर्ण रस्ता खड्ड्यात गेल्याने ‘जंपिंग ट्रॅक’ असे नाव पडलेल्या कळंब मोहा येडशी या ३० किलोमीटरच्या राज्य मार्गावरील वाहतूक आता अडथळ्याची शर्यत बनली आहे. दूरध्वनी वाहिनीसाठी खोदलेल्या रस्त्याच्या साईडपट्ट्या दाबून त्या रस्त्याच्या समांतर न केल्याने हा राज्यमार्ग वन-वे झाला आहे.
कळंब मोहा येडशी या जवळपास ३० किलोमीटर राज्यमार्गाच्या दुरवस्थेला सीमा राहिली नाही. अपवादाचा भाग वगळता हा पूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. या मार्गावर २५ गावांच्या नागरिकांचे दैनंदिन व्यवहार अवलंबून आहेत. मागील दोन वर्षांपासून मोहा येथे गूळ पावडर कारखाना कार्यान्वित झाल्याने ऊस वाहतूक करणारी वाहनांची वर्दळही वाढली आहे. जिल्हा मुख्यालयाला सर्वांत जवळचा मार्ग म्हणून कळंब शहरातील अनेक मंडळी याच मार्गे उस्मानाबाद गाठतात. असा महत्त्वाचा मार्ग असतानाही या रस्त्याचे पालकत्व असलेला बांधकाम विभाग या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी पुढाकार घेताना दिसत नाही.
सध्या संपूर्ण रस्त्याची दुरवस्था झाली असताना आता या मार्गाच्या बाजूने दूरध्वनीसाठी ओएफसी केबल टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मोहा ते येडशी या १६ किमी रस्त्यावर रस्त्याच्या बाजूने खोदकाम करणे गरजेचे असताना संबंधित कंत्राटदाराने बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या साइडपट्ट्या खोदून टाकल्या आहेत. त्यामुळे अगोदरच खड्ड्यामुळे हा रस्ता जंपिंग झाला असताना खोदलेल्या मातीची ढेकळे साइडपट्ट्याच्या जागी आल्याने या मार्गावरून आता एकेरी वाहतूक होते आहे. त्यातच ऊस वाहतूक करणारे अथवा जड वाहन पुढे असेल तर मागे चालणाऱ्या वाहनांना त्याच गतीत चालावे लागत आहे. ओव्हरटेक करण्यासाठी कामी येणाऱ्या साइडपट्ट्या खोदून टाकल्याने वाहनधारकांवर ही नामुष्की येते आहे.
हा खोदकामाचा प्रकार वाहतुकीसाठी अडथळा तर ठरतोच आहे; शिवाय, अपघाताचे धोके वाढविणारा आहे. बांधकाम विभागाने हा प्रकार तरी गांभीर्याने घेऊन किमान साइडपट्ट्या मजबूत करून घ्याव्यात व रस्ता वाहतुकीसाठी अनुकूल बनवावा, अशी मागणी वाहनधारकातून होते आहे.
चौकट -
ओएफसी लाइन टाकणाऱ्या संबंधित कंत्राटदारांना खोदकाम केलेल्या साइडपट्ट्याचा भाग पूर्ववत करून द्यायच्या सूचना केल्या आहेत. वाहिनी टाकण्याची कामे पूर्ण झाल्यावर ते काम करण्यात येईल, असे कंत्रादारांनी सांगितले आहे. त्यामुळे आगामी काळात वाहतूक सुरळीत होईल.
- सुखदेव पाटुळे, शाखा अभियंता, सा. बां. उपविभाग, कळंब
कॅप्शन -
कळंब- मोहा- येडशी या राज्यमार्गाच्या साइडपट्ट्या ओएफसी केबल टाकण्यासाठी खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थित दाबून बुजविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे रस्त्यावर खड्डे अन् साइडपट्ट्यावर ढेकळे अशी या राज्यमार्गाची अवस्था झाली आहे.