उमरगा- गेल्या कित्येक वर्षांपासून अवैद्य धंद्यामुळे चर्चेत असलेली उमरगा शहराजवळील जकेकूर शिवारातील औद्योगिक वसाहतीत आता आणखीन एक प्रकरण उघडकीस आले आहे. तांदळाच्या उद्योग केंद्रात अनाधिकृतपणे पेट्रोलियम पदार्थाचा (डिझेल सदृश्य द्रव) साठा आढळून आला. उपविभागीय पोलिस अधिकारी अनुराधा उदमले यांच्या पथकाने २४ जून राेजी कारवाई करीत घटनास्थळावरून डिझेल सदृश्य द्रव पदार्थासह सुमारे तेरा लाख ५३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, या प्रकरणी कर्नाटकातील रहिवासी असलेल्या कंपनीच्या व्यवस्थापकासह जागा मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमरगा शहरापासून काही अंतरावर जकेकूर शिवारात औद्याेगिक वसाहत आहे. या वसाहतीतच श्री लक्ष्मी तिम्मप्पा फुड इंडस्ट्रीज (राईस मिल) नावाची कंपनी आहे. या कंपनीमध्ये सुमारे २५ हजार लिटर क्षमता असलेल्या एका टॅंकमध्ये पेट्राेलियम पदार्थांची साठवणूक केली असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी अनुराधा उदमले यांना मिळाली. या गुप्त माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे, पाेकाॅ. चैतन्य कोनगुलवाड, बोदनवाड यांचे पथक बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास संबंधित कंपनीत दाखल झाले. यावेळी तेथील एका लाेखंडी टॅंकमध्ये पेट्राेलियम पदार्थ असल्याचे दिसून आले. यानंतर पथकाने उपस्थित जाकीर पाशामियाॅं चिद्री (रा. दुबलगुंडी, ता. हुमनाबाद, जि. बिदर) या कामगाराकडे चाैकशी कली असता, कंपनीचे व्यवस्थापक महेश गवळी (रा. आळंद) हे असल्याचे सांगितले. यानंतर पाेलिसांनी गवळी यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी संबंधित साठ्याच्या अनुषंगाने काेणतीही कागदपत्रे वा अधिकृत कायदेशीर माहिती दिली नाही. त्यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी उदमले यांनी घटनास्थळाला भेट देवून दोन शासकीय पंचासमक्ष गुरुवारी सांयकाळी पंचनामा केला.
जप्तीमध्ये अकरा लाख २८ हजार रूपये किमतीचे बारा हजार लिटर डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ, दोन लाख रूपये किंमतीचा पेट्रोलियम पदार्थ साठवणुकीसाठीचा लोखंडी टँक, दहा हजार रूपये किंमतीची एक हिरव्या रंगाची सुुगुना कंपनीची इलेक्ट्रीक मोटर, पंधरा हजार रुपये किंमतीची एक निळ्या पांढऱ्या रंगाची डिझेल भरण्याकरीता वापरण्यात येणारी मशीन असे एकूण तेरा लाख ५३ हजार रूपये किंमतीची साधने व डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थ जप्त करण्यात आले. सुरक्षिततेकरीता पोलीस गार्ड तैनात करण्यात आले असून या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल चैतन्य कोंगुलवार यांच्या फिर्यादीनुसार महेश गवळी व जागा मालकाविरूद्ध जिवनावश्यक वस्तुचे अधिनियम कलम ३, ७ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी डिझेल सदृश्य द्रव्य पदार्थाचे नमुने सी.ए. तपासणीसाठी घेण्यात आले आहे. याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नसून या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव हे करीत आहेत.
उमरगा येथील औद्योगिक वसाहतीत अवैध धंदे मोठ्या प्रमाणात होत असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. येथे १३ जानेवारी २०१८ साली बंगळुरू येथील केंद्रीय महसूल गुप्तचर विभागाने धाड टाकून मेथोक्युलाईन हे ५० लाखाचे अंत्यत महागडे अंमली पदार्थ जप्त केले होते.हे अंमली पदार्थ या वसाहतीत तयार करून पूर्ण भारतात वितरित केले जात होते. त्याच बरोबर या औद्योगिक वसाहतीत तांदूळ,गहू आदींचा काळाबाजार होत असल्याची चर्चा असून यापूर्वीही येथे अवैद्यरित्या तांदूळ साठविल्याप्रकरणी कारवाई झालेली आहे. येथील एक तांदूळ कारखान्यात दुसऱ्या राज्यातील रेशनचे तांदूळ आणून प्रक्रिया केली जात असल्याची चर्चा आहे.