धाराशिव : बारा गुन्ह्यात चोरीस गेलेले सोने-चांदीचे दागिने, मोबाइल, दुचाकी असे साहित्य पोलिसांनी जप्त करून मूळ मालकांच्या स्वाधीन केले आहे. साहित्य परत मिळाल्यानंतर मूळ मालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू दाटले होते. त्यांनी कृतज्ञता व्यक्त करीत पोलिसांना हात जोडले.
जिल्ह्यात शहरी तसेच ग्रामीण भागात चोऱ्यांच्या घटना सातत्याने वाढत आहेत. काही घटनांचा पोलिस छडा लावत चोरट्यांच्या मुसक्या आवळून मुद्देमाल जप्तही करीत आहेत. मागील काही महिन्यांमध्ये कळंब, येरमाळा, तुळजापूर, अंबी, मुरुम, बेंबळी पोलिस ठाण्याच्या पथकाने १२ गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला होता. तो मुद्देमाल मूळ मालकास परत करण्याचा कार्यक्रम जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांच्या संकल्पनेतून शुक्रवारी पोलिस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात घेण्यात आला.
यावेळी ६० ग्रॅम वजनाचे दागिने, ४९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने, मोबाइल व दुचाकी असा एकूण ४ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिस अधीक्षकांच्या हस्ते मूळ मालकास परत करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी गीतांजली दुधाने, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, पोलिस निरीक्षक साबळे, सहायक पोलिस निरीक्षक पाटील, शिंदे, पोलिस अधीक्षक कार्यालयातील अधिकारी, अंमलदार व १० ते १५ मूळ मालक उपस्थित होते.