उस्मानाबाद : चोरी प्रकरणातील न्यायालयीन प्रक्रियेत दीर्घ काळ अडकून बसलेले एक अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र अखेर मूळ मालकिणीस मंगळवारी परत मिळाले. थोडथोडके नव्हे तर तब्बल २२ वर्ष त्यासाठी उलटावी लागली. ही घटना कळंब तालुक्यातील आहे. कळंब पोलिसांनी न्यायालयाच्या आदेशानंतर वृद्ध दांम्पत्यास हे मंगळसूत्र सन्मानपूर्वक प्रदान केले.
कळंब तालुक्यातील वाकरवाडी येथील शकुंतला विठ्ठल शिंदे या शेतकरी महिला आहेत. धार्मिक स्वभावामुळे देव-देव करण्यात त्यांना रस होता. १९९८ साली त्याच धार्मिक भावनेतून त्या येरमाळा येथील येडेश्वरी देवीच्या यात्रेस गेल्या होत्या. याठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविकांची हजेरी लागत असते. चुना वेचण्याच्या विधीला तर ही गर्दी ५ लाखांच्याही पुढे जाते. नेमके याच गर्दीत शंकुतला शिंदे याही सहभागी होत्या. गर्दीचा गैरफायदा घेत चोरट्याने त्यांच्या गळ्यातील अडीच ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र पळवून नेले. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यावेळी कळंब ठाण्यात अंतर्गत असलेल्या येरमाळा पोलीस चौकीत त्यांनी तक्रार नोंदविली होती.
तत्कालीन कर्मचार्यांनी या गुन्ह्याचा वर्षभरातच छडा लावून चोरट्यास मंगळसूत्रासह गजाआड केले होते. पुढे पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. तारखा अन् सुनावण्यात न्यायालयाचा बराच वेळ गेला. शिवाय, मध्यंतरी पाठपुरावाही काहिसा कमी झाला. त्यामुळे न्यायालयीन प्रक्रियेतच हे मंगळसूत्र अडकून पडले. दरम्यान, १३ जुलै २०१९ रोजी कळंब न्यायालयात लोकअदालत झाली. त्यात हे प्रकरण पटलावर आले. तेव्हा याच लोकअदालतीने फिर्यादी महिलेस मंगळसूत्र परत करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यानंतर मंगळवारी शकुंतला शिंदे यांना त्यांच्या पतीच्या उपस्थितीत पोलिसांनी हे मंगळसूत्र सन्मानपूर्वक प्रदान केले.
अन् त्यांचे डोळे पाणावले...मंगळसुत्राची चोरी झाली तेव्हा शकुंतला शिंदे या साधारणत: चाळिशीत होत्या. आता साठी उलटून गेल्याने मंगळसूत्र घेण्यासाठी त्यांना गावातून कळंब ठाण्याला येणेही जिकिरीचे बनले होते. त्यातच लॉकडाऊन व कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शिंदे दाम्पत्याने ठाण्यात येणेच टाळले. मात्र, पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांनी पुढाकार घेऊन त्यांना ठाण्यात बोलावून घेत हे मंगळसूत्र प्रदान केले. यावेळी शकुंतला शिंदे यांना गहिवरुन आले व त्यांचे डोळे पाणावले, असे दराडे यांनी सांगितले.