तुळजापूर (जि.धाराशिव) : शहरातील धाराशिव रस्त्यावर असलेली एक मोबाइल शाॅपी फोडून तब्बल ३० लाखांचे मोबाईल चोरट्यांनी काही दिवसांपूर्वीच पळविले होते. या गुन्ह्याचा तपास करताना मुंबई व मालेगाव येथील दोन आरोपींना तुळजापूर पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून २३ लाख रुपये किंमतीचे मोबाईल जप्त केले आहेत. या गुन्ह्यातील आणखी दोन चोरटे फरार आहेत.
तुळजापूर शहरातील सचिन शिंदे यांचे धाराशिव रस्त्यावर मोबाईलचे दुकान आहे. २० मार्च रोजी पहाटेच्या सुमारास या दुकानाचे शटर अर्धवट उचकटून चोरट्यांनी विविध नामांकित कंपन्यांचे ११९ मोबाइल व अक्सेसरीज, असा ३० लाख ३१ हजार ३८१ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याबाबत तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, गुन्हा दाखल होताच पोलिस निरीक्षक अजिनाथ काशीद व सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे यांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. शिवाय, खबर्यांचे नेटवर्क ॲक्टीव्ह केले. तेव्हा या गुन्ह्यात अकबर खान हबीब खान (रा.मालेगाव जि. नाशिक) व आबु शाहिद असरफ आली शेख (रा.शिवाजीनगर, मुंबई) यांचा सहभाग असल्याची माहिती समोर आली.
यानंतर सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, कर्मचारी अतुल यादव, धनंजय लाटे, आनंद साळुंके, सनी शिंदे, पवार, गणेश माळी यांच्या पथकाने या दोघांनाही त्यांच्या घरातून ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता या गुन्ह्यात अतिक अहमद रफिक आणि इमरान खान सुलेमान खान यांचाही सहभाग असल्याचे समोर आले. चोरीचे मोबाईल फरार आरोपी इमरान खान सुलेमान खान याच्या घरी असल्याचे समजताच त्याच्या घराची झडती घेऊन २३ लाख ६ हजार ३९६ रुपये किंमतीचे मोबाईल येथून जप्त करण्यात आले. पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अजिनाथ काशिद यांनी दिली.