भूम (उस्मानाबाद) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दूध दरवाढीबाबत सुरु केलेल्या आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी उस्मानाबाद जिल्ह्यात दगडफेकीचा प्रकार घडला़ लातुरात दूध वितरीत करुन सकाळी जामखेडकडे परत निघालेल्या एका रिकाम्या टँकरवर पाथरुडनजिक दगडफेक झाली़ त्यात वाहनाच्या काचा फुटून नुकसान झाले़
नगर जिल्ह्यातील एका दुग्ध उत्पादक संस्थेचा टँकर लातुरात दूध वितरणासाठी काल रात्रीच गेला होता़ दूधाचे वितरण झाल्यानंतर सकाळी उस्मानाबाद जिल्ह्यातून जामखेडकडे निघालेल्या एमएच १७ एजी ३१९३ क्रमांकाच्या रिकाम्या टँकरवर पाथरुड गावानजिक दगडफेक करण्यात आली़ अज्ञात पाच तरुणांनी या सकाळी १०़३० वाजण्याच्या सुमारास जीपमधून येवून ‘स्वाभिमानी संघटनेचा विजय असो’, अशा घोषणा देत टँकरवर दगडफेक केली़ यात टँकरच्या काचा फुटून नुकसान झाले़ यानंतर दगडफेक करणारे घटनास्थळावरुन पसार झाले़ दूध वाहतूक करणारा हा टँकर भूम पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून, याबाबत चालक ़संजय इल्ले यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे़