कळंब : एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा यासह खाजगीकरण करण्यात येवू नये या मागणीसाठी कळंब आगारातील एक वाहक गुरूवारी सकाळपासून बीएसएनएलच्या टॉवरवर अंदाजे २१० फूट उंचीवर जावून बसला आहे. याठिकाणी त्यांनी अन्नत्याग आत्मक्लेश आंदोलन सुरू केल्याने प्रशासन हतबल झाले आहे.
सच्चिदानंद अशोक पूरी हे कळंब आगारात वाहक म्हणून काम करतात. मागच्या तीन वर्षापासून ते एसटी कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी संघटनाविरहीत लढा देत आहेत. यातून त्यांनी यापूर्वी कळंब शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या बीएसएनएल टॉवरवर चढून कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यासाठी आंदोलन केले होते. याशिवाय आगारातील एका उंच झाडावर चढून तीव्र आंदोलन केले होते. आता आपल्या सहकारी कर्मचारी बांधवांच्या सातव्या वेतन आयोग लागू करण्याच्या प्रलंबित मागणीसह एसटीचे खाजगीकरण करू नये यासाठी त्याच बीएसएनएल टॉवरवर चढून सकाळपासूनच आत्मक्लेश अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
२६० फूट उंच टॉवर, दोनशे फुटावर ठिय्या...शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून हाकेच्या अंतरावरील भारत संचार निगम लिमिटेडच्या आवारात २६० फूट उंचीचा भ्रमणध्वनी मनोरा आहे. या टॉवरची भल्या सकाळीच चढाई करून साधारणतः २१० फूट उंचीवर आंदोलक वाहक सच्चिदानंद पुरी यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
प्रशासनाने साधला संवाद...दरम्यान, आंदोलनस्थळी नायब तहसीलदार राजेश तापडिया, आगार प्रमुख मिथुन राठोड, मंडळ अधिकारी टी. डी. मटके, तलाठी व्यंकटेश लोमटे व पोलिस कर्मचारी श्रीराम मायंदे, विनोद चेडे व अन्य पोलिस कर्मचारी ठाण मांडून होते. नायब तहसीलदार राजेश तापडिया यांनी आंदोलक यांच्या नातेवाईकांशी, एसटी कर्मचाऱ्यांशी व आंदोलक पुरी यांच्याशी संवाद साधला. मागण्या शासनापर्यंत पोहचू असे सांगितले, मात्र दुपारी अडीच वाजेपर्यंत तोडगा निघाला नव्हता.
आंदोलक उंचीवर, यंत्रणा जमिनीवर...दरम्यान, डोळ्यांना दिसत नाही इतक्या उंचीवर एसटी महामंडळाच्या कळंब आगाराचे वाहक अन्नत्यागास बसले आहेत. खाली आवारात एसटी कर्मचारी, प्रशासन तळ ठोकून आहे. अग्निशमन बंब, रुग्णवाहिका तैनात आहे. बघ्यांची गर्दी आहे, इतर कर्मचाऱ्यांची ये-जा सुरू आहे.