भूम (जि.धाराशिव) : सरकार कोणतेही आले तरी शेतकऱ्यांचे प्रश्न कायमच दुर्लक्षित ठेवले जातात. त्यामुळे यापुढे राजकीय नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणे बंद करुन आता फक्त शेतकरी बापासाठी लढण्याचा निर्धार करीत गुरुवारी असंख्य शेतकरी पुत्रांनी भूम येथे मोर्चा काढला. याद्वारे विविध मागण्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी शेतकरी पुत्रांनी गुरुवारी भूम येथे आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते. सुरुवात शहरातील आठवडी बाजार येथून करण्यात आली. मोर्चाला सुरुवात होताच शेतकऱ्यांनी, त्यांच्या पुत्रांनी बास झाले नेत्यांसाठी, आता लढू फक्त आपल्या शेतकरी बापासाठी, अशी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच २५ टक्के अग्रीम विमा मिळालाच पाहिजे, दुधाला भाव मिळालाच पाहिजे, शेतकरी एकजुटीचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चा आठवडी बाजार येथून साठे चौक, नगर पालिका, ओंकार चौक मार्गे गोलाई येथे धडकला. यावेळी येथे शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी भर उन्हात शेतकऱ्यांच्या समस्यांवर मनोगत व्यक्त केले. यानंतर उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.