धाराशिव : तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी जमीनीचे अभिलेख पुरावे नष्ट करून जमीन गायब केल्याचा आरोप करीत लोहारा तालुक्यातील वडगाव वाडी येथील आठ शेतकरी बुधवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत.
वडगाव वाडी येथील दिलीप माने, शिवाजी माने, महादेवी ढबाले, चंद्रकांत गिराम, शिवाजी गिराम, एकनाथ गिराम, मधुकर गिराम व तुळजापूर तालुक्यातील काटी येथील कुसुमबाई उर्फ लक्ष्मीबाई जाधव यांनी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणकर्ते म्हणाले, वडगाव वाडी येथील वडिलोपार्जित जमीन तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी यांनी जाणीपूर्वक, संगनमताने अभिलेखाचे पुरावे नष्ट करून संबंधित क्षेत्र गायब केले.
याबाबत तलाठी कार्यालय, महसूल विभाग ते मुख्यमंत्री कार्यालयात निवेदने दिली. तसेच संभाजीनगर येथील उच्च न्यायालयात न्यायासाठी धाव घेतली. ५ जानेवारी २०२३ मध्ये सदर प्रकरणात लोहारा तहसीलदार, जेवळी मंडळाधिकारी, वडगाव तलाठी यांच्याकडून फेरफार पुनर्विलोकनाचा अर्ज फेरफार क्रमांक ५७ची प्रत न्यायालयात उपलब्ध करता आली नाही. त्यामुळे न्याय निवाडा झाला नाही. त्यानंतर तहसीलदार यांच्याकडे अपील करण्यात आली. मात्र, त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. शासनाच्या चुकीमुळे जमिनीपासून वंचित राहावे लागत असून, न्याय मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याचा पवित्रा उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.