लोहारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्य शासनाने संचारबंदी जाहीर केली आहे. त्यानुसार येथील पोलीस प्रशानाकडून दिवसा व रात्री देखील कडेकोट बंदोबस्त लावून या आदेशाची अंमलबजावणी केली जात आहे.
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नगरपंचायत प्रशासन, आरोग्य, पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र, तरीही संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कोरोनाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी लावण्यात आली आहे. त्यात लोहारा शहरासह तालुक्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. शहरासह तालुक्यात एकही कोविड रुग्णालय नाही. त्यामुळे रुग्णांना उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर आदी ठिकाणी उपचारासाठी जावे लागते. परंतु, सध्या तेथेही बेड उपलब्ध नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे स्थिती गंभीर बनली आहे.
अशा परिस्थितीत नियमाचे पालन करण्याशिवाय दुसरा कुठलच पर्याय नाही. सध्या तालुक्यात कोरोना रुग्णांचा आकडा हजारच्या पुढे गेला असून, ३१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असा सल्ला वारंवार आरोग्य विभागाकडून देण्यात येत आहे. त्यात लॉकडाऊन जाहीर करून संचारबंदी लागू करण्यात आली असून, पोलीस प्रशासनाकडून याची कडक अमलबजावणी सुरू आहे. शहरातील चौकाचौकात नाकेबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनाची कसून चौकशी केली जात आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे.
चौकट..........
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने संचारबंदी जाहीर केली आहे. त्यांची अमलबजावणी पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे. परंतु, विनाकारण कोणी रस्त्यावर फिरत असेल तर त्यांच्यावर दंडात्मक करण्यात येणार आहे.
- धरमसिंग चव्हाण, पोलीस निरीक्षक, लोहारा
कोरोना रोखण्यासंदर्भात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार नागरिकांनी नियमाचे पालन करावे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
- गजानन शिंदे, मुख्यधिकारी, नगरपंचायत