उमरगा : तालुक्यात लॉकडाऊनच्या कडक अंमलबजावणीनंतर कोरोनाबधित रुग्णांची संख्या कमी होऊ लागली आहे. ६ मे रोजी सर्वाधिक ९८ कोरोनाबधितांची भर पडली होती. परंतु, यानंतरच्या २० दिवसात दररोज यात घट होत असून, २७ मे रोजी ही संख्या २६ पर्यंत खाली आली आहे. तालुक्यात आतापर्यंत ५ हजार ९७१ कोरोनाबाधित आढळून आले असून, त्यातील ५ हजार ३४४ जणांनी उपचारानंतर यावर मात केली. आतापर्यंत २४७ जणांचा या आजाराने बळी घेतला आहे. दुसऱ्या लाटेतील मृत्यू दर ४.१४ टक्के झाला असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के झाले आहे.
तालुक्यात कोरोनाच्या पहिल्या लाटेत एक वर्षात १ हजार ९८० व्यक्तींना कोरोना संसर्ग झाला होता. शिवाय, वर्षभरात २८ कोरोना बधितांचा मृत्यू झाला होता. मात्र, दुसऱ्या लाटेत मार्चपासून तालुक्यात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते. मार्च, एप्रिल व मे या तीन महिन्यात ३ हजार ९९१ व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. या तीन महिन्याच्या कालावधीत २१९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे दुसऱ्या लाटेत मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. पहिल्या लाटेत १.४१ टक्के असलेला मृत्यूदर आता ४.१४ झाला आहे. मृतांमध्ये ६० वर्षावरील वृद्ध व मधुमेह, उच्च रक्तदाब अशा रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
तालुक्यात ६ मे रोजी एकाच दिवशी ९८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली होती. हा सर्वात उच्चांकी आकडा होता. त्यानंतर लॉकडाउनचा परिणाम हळूहळू जाणवू लागला. दररोज कोरोनाबधितांची संख्या कमी होत चालली असून, २७ मे रोजी ही संख्या २६ पर्यंत खाली आली. यामध्ये शहरातील १० तर ग्रामीण भागातील १६ व्यक्तींचा समावेश आहे. तालुक्यात आजपर्यंत शहरातील २ हजार ६५४ तर ग्रामीण भागातील ३ हजार ३१७ लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला. यामुळे शहरी भागापेक्षा ग्रामीण भागातच कोरोनाची लागण जास्त प्रमाणात झाल्याचे दिसून येते. तालुक्यातील ५ हजार ३४४ लोकांनी कोरोनावर मात केली असून, यामध्ये २ हजार ४९६ शहरी तर २ हजार ८४८ ग्रामीण रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्येही सर्वाधिक १७१ मृत्यू ग्रामीण भागातील तर ७६ मृत्यू शहरातील आहेत.
सध्या तालुक्यात कोरोनाचे ३८० ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामध्ये २९८ ग्रामीण भागातील तर ८२ शहरातील आहेत. तालुक्याचा मृत्यू दर ४.१४ वर गेला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५० झाले आहे.
चौकट........
६६ प्रतिबंधित क्षेत्र कायम
तालुक्यात वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे आतापर्यंत ५१८ प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्यात आले होते. त्यापैकी सध्या ६६ प्रतिबंधित क्षेत्र कायम आहेत.
उमरगा शहरात वाढत्या कोविड रुग्णांची संख्या विचारात घेऊन उपजिल्हा रुग्णालय केवळ कोविड रुग्णालय करण्यात आले आहे. तसेच गजानन रूग्णालय, डॉ. के. डी. शेंडगे, शिवाई रूग्णालय, विजय क्लिनिक, माउली रूग्णालय, मातृछाया रूग्णालय, नरवडे रुग्णालय या खाजगी रुग्णालयास कोविड रुग्णालय म्हणून मान्यता देण्यात आली आहे. याठिकाणी ३४२ साधे, ६३ आयसीयू, २३ व्हेंटिलेटर तर १३१ ऑक्सिजन असे एकूण ५३६ बेड आहेत. सीसीसी ईदगाह, गुंजोटी रोड, शिवाजी कॉलेज, आई साहेब मंगल कार्यालय, मीनाक्षी मंगल कार्यालय या कोविड केअर सेंटरमध्ये देखील कोविड रुग्णांची सोय करण्यात आली आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात ८५, ईदगाह सीसीसीमध्ये २२, शिवाई रुग्णालयात २४, शेंडगे रुग्णालयात १२, शिवाजी कॉलेज हॉस्टेलमध्ये २४, गजानन हॉस्पिटलमध्ये २, नरवडे रुग्णालयात ५, समर्पण रुग्णालयात ११, विजय पाटील हॉस्पिटलमध्ये २८, मातृछाया हॉस्पिटलमध्ये ४, आईसाहेब मंगल कार्यालयात ६०, मीनाक्षी मंगल कार्यालयात ४५ तर होम आयसोलेशनमध्ये २५ रुग्ण असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक बडे यांनी दिली.