कळंब : येथील उपजिल्हा रुग्णालयातील विविध समस्या, तक्रारी, अडचणींसंदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर सोडविण्यास प्राधान्य देऊ. तसेच उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रणा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी दिली.
मंगळवारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक घेण्यात आली. या वेळी रुग्णांच्या गैरसोयी दूर करण्यासंबंधी सखोल चर्चा करून निर्णय घेण्यात आले. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा होऊन उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी ऑक्सिजन प्लांट उभा करणे, महात्मा फुले जनआरोग्य योजनेसाठी समिती स्थापन करून गरजू रुग्णांना फायदा मिळवून देणे, रुग्ण व नातेवाइकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी न.प.च्या माध्यमातून वॉटर एटीएम बसवून देणे, रुग्णांच्या नातेवाइकांना निवारा उपलब्ध करून देणे, वाहनांसाठी वाहनशेड उभारणे, उपजिल्हा रुग्णालयात कोविडव्यतिरिक्त इतर रुग्ण तपासणी व उपचार पूर्वीप्रमाणे सुरू करणे, विविध पद भरती त्वरित करावी, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी केली.
रुग्णालयाच्या विस्तारित इमारतीसाठी मंजूर जागेची हस्तांतरण प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती रुग्ण कल्याण समितीचे हर्षद अंबुरे यांनी या वेळी दिली. रुग्णांच्या नातेवाइकांना निवारा सोयीसाठी आमदारांकडे पाठपुरावा करण्याची जबाबदारी सुशील तीर्थंकर यांनी घेतली. बैठकीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. जीवन वायदंडे, रुग्ण कल्याण समिती सदस्य डॉ. रामकृष्ण लोंढे, सुशील तीर्थंकर, हर्षद अंबुरे, न.प.चे संजय हाजगुडे, डॉ. सुधीर औटी, हेड्डा, परशुराम कोळी आदींनी पुढाकार घेतला.
100821\img-20210810-wa0066.jpg
कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ धनंजय पाटील यांनी भेट देऊन रुग्ण कल्याण समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ जीवन वायदंडे, डॉ रामकृष्ण लोंढे, हर्षद अंबुरे, सुशील तीर्थकर आदी उपस्थित होते.