दिशाभूल, मानहानी केल्याचा आरोप
उस्मानाबाद : ग्रामपंचायत सदस्याने ग्रामसभेबाबत खोटी तक्रार देऊन सरपंचांची मानहानी तसेच प्रशासनाची दिशाभूल केल्याचा आरोप करीत त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी भूम तालुक्यातील चिंचोली येथील उपसरपंचासह दोघा ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील ग्रामपंचायत सदस्य तात्यासाहेब वारे यांनी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेबाबत तक्रार दिली होती. यावरून १४ व २४ जून रोजी झालेल्या चौकशीमध्ये या तक्रारीत कसलेही तथ्य नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे खोटी तक्रार देऊन त्यांनी सरपंचांची मानहानी तसेच प्रशासनाची देखील दिशाभूल केली आहे.
या खोट्या तक्रारीबाबत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी यापूर्वी २१ जून रोजी ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांनी आपणाकडे निवेदन दिले होते. परंतु, त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी २८ जून पासून उपसरपंच औदुंबर वारे, ग्रामस्थ शिवलिंग शिर्के व सोमनाथ वारे हे
आपल्या कार्यालयासमोर उपोषणास बसत असल्याचे या निवेदनात म्हटले आहे.