उस्मानाबाद : सध्या दुष्काळी परिस्थिती आहे. अशा काळात डॉक्टरांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुख्यालय सोडू नये, असे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी गुरूवारी काही उपकेंद्रांना अचानक भेट दिली असता, तीन ठिकाणी आरोग्यसेवक अनधिकृतरित्या गैरहजर असल्याचे आढळून आले. या तिघांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील रूग्णांना वेळेवर आणि माफक दरामध्ये आरोग्यासंबंधी सेवा मिळाव्यात यासाठी आता उपकेंद्रांनाही ‘बीएएमएस’धारक डॉक्टरांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे उपकेंद्रांतूनही दर्जेदार सेवा मिळाव्यात यासाठी डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे. तसे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत. दरम्यान, डॉक्टरासंह कर्मचारी खरोखरच मुख्यालयी वास्तव्यास आहेत का? रूग्णांना वेळेवर सेवा देताहेत का? आदी बाबींची तपासणी करण्याच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे यांनी तामलवाडी, माळुंब्रा, पिंपळा खुर्द आदी उपकेंद्रांना अचानक भेट देवून तपासणी केली.
यावेळी तीनही ठिकाणी आरोग्य सेवक अनधिकृतरित्या गैरहजर असल्याचे समोर आले. त्यांनी उपस्थित कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता, त्यांच्याकडेही माहिती नव्हती. यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, मोबाईल स्विचआॅफ आले. त्यामुळे डॉ. वगडागवे यांनी संबंधित उपकेंद्रातील आरोग्य सेवक जे. एल. गोप, एम. बी. धोत्रे आणि ए. एस. भालेकर यांचे एक दिवसाचे वेतन कपात करण्याचे आदेश दिले. तसेच संबंधित तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तीन दिवसात नोटिसेचा खुलासा करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. त्यामुळे आता संबंधित कर्मचाऱ्यांविरूद्ध कोणती कारवाई होते? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.
उपकेंद्रांना अचानक भेट दिली असता तीनही ठिकाणी आरोग्य सेवक गैरहजर असल्याचे आढळून आले. त्यामुळे वेतन कपातीसोबतच त्यांना नोटीस देण्यात आली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कार्यवाही अनुसरण्यात येईल.- डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.