उस्मानाबाद : नगदी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल उसाकडे अधिक आहे. २०१८ मध्ये जिल्हाभरातील शेतकऱ्यांनी सुमारे ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड केली. उसाचे हे क्षेत्र सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक आहे. परंतु, अत्यल्प पर्जन्यमान झाले. त्यामुळे पाण्याअभावी थोडाथोडका नव्हे, तर तब्बल २८ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस मोडून काढण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली.
सीना-कोळेगाव वगळात जिल्ह्यात एकही मोठा प्रकल्प नाही. याही प्रकल्पाचा परंडा वगळता अन्य तालुक्यांना फारसा फायदा होत नाही. असे असतानाही एखाद दुसऱ्या वर्षी दमदार पाऊस झाल्यानंतर शेतकरी नगदी पीक म्हणून ओळख असलेल्या ऊस लागवडीवर भर देतात. ऊस पिकाखालील जिल्ह्याचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार १०० हेक्टर एवढे असले तरी २०१८ मध्ये शेतकऱ्यांनी मोठ्याप्रमाणात ऊस लागवड केली. तब्बल ४८ हजार ८५६ हेक्टर क्षेत्र उसाखाली आले. असे असतानाच अख्ख्या पावसाळ्यात जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्केच पाऊस झाला. काही तालुक्यात तर पन्नास टक्केही पाऊस पडला नाही. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील सर्वच तालुके भीषण दुष्काळाचा सामना करीत आहेत.
दुष्काळी दाह एवढा तीव्र आहे की, एकेका गावात पिण्यासाठी पाणी नाही. ३० ते ३५ किमी अंतरावरून टँकरद्वारे पाणी आणावे लागत आहे. अशा परिस्थितीत पिकांसाठी पाण्याचा विचार न केलेलाच बरा. दुष्काळी तडाखा इतर पिकांसोबतच ऊसशेतीलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. थोडेथोकडे नव्हे, तर पन्नास टक्के क्षेत्र उद्ध्वस्त झाले आहे. ४८ हजार ८५६ पैकी २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रातील ऊस शेतकऱ्यांनी मोडून काढला आहे. त्यामुळे आजघडीला केवळ २० हजार ४४५ हेक्टर क्षेत्रावरच ऊस उला आहे. दरम्यान, यापैकी आणखी काही क्षेत्र कमी होऊ शकते, अशी भिती कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड...दमदार पाऊस पडेल, या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी नव्याने उसाची लागवड केली होती. सुरूवातीच्या काळात बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे ऊसही जोमदार अला होता. परंतु, कालांतराने पावसाने दडी मारली. अख्ख्या पावसाळ्यात वार्षिक सरासरीच्या ५२ ते ५४ टक्के पाऊस झाला. काही भागात तर पर्जन्यमान पन्नास टक्क्यांच्या आतच आहे. त्यामुळे उसणवारी तसेच पीक कर्ज काढून उसाची नव्याने लागवड केलेले असंख्य शेतकरी अडचणीत आले ओहत. अर्थकारण कोलमडल्यामुळे अशा शेतकऱ्यांना शासनाने आर्थिक आधार देण्याची गरज व्यक्त होत आहे.