धाराशिव : शिवसेना कोणाची, यावरुन सर्वोच्च न्यायालयात लढा सुरु आहे. या खटल्यातील निवाडा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ दे, असे साकडे हात जोडून तुळजाभवानी देवीला मंगळवारी माजी खा.चंद्रकांत खैरे यांनी घातले.
ठाकरे गटाच्या शिवसेनेचे नेते माजी खा.चंद्रकांत खैरे हे मंगळवारी धाराशिवला होते. छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची सभा होत आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी दुपारी धाराशिव येथे पक्ष पदाधिकार्यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले. जास्तीत जास्त संख्येने समर्थक, कार्यकर्ते उपस्थित राहतील, असे नियोजन करण्याच्या सूचना खैरे यांनी पदाधिकार्यांना केल्या. दरम्यान, त्यांनी तुळजापूर येथे जावून श्री तुळजाभवानी देवीचे दर्शनही घेतले. यावेळी देवीपुढे हात जोडून पक्षासाठी साकडे घातले. शिवसेना कोणाची, याचा फैसला निवडणूक आयोगाने केला असला तरी या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात प्रकरण सुरु आहे. सुनावणीअंती न्यायालयीन निवाडा हा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बाजूने येऊ दे, छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेली महाविकास आघाडीची सभा यशस्वी होवू दे, असे साकडे त्यांनी देवीला घातल्याचे सांगितले.