उस्मानाबाद : कोविड १९ या विषाणूमुळे जगभरात थैमान घातले आहे. या परिस्थितीला लढा देण्यासाठी व मानवी जीवन सुखकर करण्यासाठी अभियांत्रिकी क्षेत्राचा मोठा वाटा राहिला आहे. आयआयटी मुंबई यांनी सर्व या विषयाची दाखल घेऊन ‘ई-यंत्रा हॅकेथॉन -फायटिंग कोविड १९’ या प्रोजेक्ट कॉम्पिटिशनचे देशपातळीवर आयोजन केले होते. यात येथील तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातील सूरज पवार यांनी ८१ वे मानांकन प्राप्त केले.
आयआयटी मुंबई मार्गदर्शक असणाऱ्या ई-यंत्रा या एम्बडेड सिस्टिम आणि रोबोटिक्स लॅब स्थापित केलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील देशभरातील हजारो विद्यार्थी या हॅकेथॉनमध्ये सहभागी झाले होते. सूरज पवार याने ‘कोविड पेशंट मॅनेजमेंट सिस्टिम’ ही सॉफ्टवेअर प्रणाली निर्माण केली होती. कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णाची नोंदणी, उपलब्ध बेडची माहिती, रुग्णाला असणाऱ्या व्याधीची माहिती तसेच दिलेल्या उपचाराची माहिती या सॉफ्टवेअरमध्ये सेव्ह करता येते. सूरज पवार यांच्या प्रोजेक्टला ८१ वे मानांकन मिळाले. स्पर्धेत एकूण १ हजार ८७८ स्पर्धक सहभागी झाले होते. सूरज पवार यास हा प्रोजेक्ट बनविण्यासाठी आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे प्रोत्साहन मिळाले. प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेसंदर्भातील महाविद्यालय स्तरावरवचे काम प्रा. अनिरुद्ध देशपांडे यांनी पाहिले.