उस्मानाबाद -जिल्हा परिषद आराेग्य विभागाकडून संशयित वैद्यकीय व्यवसायिक (बाेगस डाॅक्टर) शाेधमाेहीम राबविली जाते. या माध्यमातून आजवर सुमारे १३१ संशयित वैद्यकीय व्यावसायिक समाेर आले आहेत. यापैकी ६७ जणांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला तर कारवाईची कुणकुण लागताच जवळपास ३२ आपला व्यवसाय गुंडाळला आहे.
जिल्ह्यात वैद्यकीय व्यवसाय करायचा असेल तर जिल्हा परिषद आराेग्य विभागाची रितसर परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी देताना प्रशासनाकडून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केल्याची प्रमाणपत्रे घेतल्याखेरीज हिरवा कंदिल दिला जात नाही. दरम्यान, प्रशासनाला अंधारात ठेवून काही मंडळी ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत प्रॅक्टिस सुरू करतात. असे संशयित व्यावसायिक शाेधण्यासाठी आराेग्य यंत्रणेकडून स्वतंत्र माेहीम राबविली जाते. या माध्यमातून समाेर येणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाच्या दवाखान्यावर कारवाई केली जाते. आजवर जिल्ह्यात १३१ संशयित डाॅक्टर आढळून आले आहेत. यापैकी ६७ जणांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात आला तर कारवाईची कुणकुण लागताच जवळपास ३२ जणांनी आपले व्यवसाय गुंडाळले. सहा प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत. त्यातील काहीजण दगावले आहेत तर १६ जणांना न्यायालयाने व्यवसाय करण्याची परवानगी दिली आहे. संशयित डाॅक्टरांची संख्या लक्षात घेता, आराेग्य यंत्रणेने ही शाेधमाेहीम अधिक गतिमान करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
चाैकट...
आजवर ६७ जणांविरुद्ध पाेलीस करवाई
जिल्हा परिषद आराेग्य व विभागाकडून आजवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून थाेडेथाेडके नव्हे तर तब्बल १३१ संशयित वैद्यकीय व्यावसायिक समाेर आले हाेते. चाैकशीअंती यापैकी जवळपास ६७ संशयित डाॅक्टरांविरूद्ध पाेलीस कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, उपराेक्त कारवाई झालेल्यांपैकी १६ जणांना पुन्हा वैद्यकीय व्यवसाय करण्यास न्यायालयाने अनुमती दिल्याचे आराेग्य विभागाकडून सांगण्यात आले.
कारवाईच्या भीतीने गाव साेडले...
मध्यंतरी आराेग्य विभागाकडून संशयित डाॅक्टरांची शाेधमाेहीम अधिक गतिमान करण्यात आली हाेती. आराेग्य विभागाच्या या कारवाईची कुणकुण लागताच जिल्हाभरातील जवळपास ३२ संशयित डाॅक्टरांनी आपले दवाखाने बंद करून गाव साेडले. त्यामध्ये उमरगा तालुक्यातील सर्वाधिक ११ संशयित डाॅक्टरांचा समावेश आहे. त्यानंतर उस्मानाबाद दहा, परंडा चार, वाशी चार तसेच कळंबमधील तिघांचा समावेश आहे.
न्यायालयाने दिली अनुमती
आराेग्य विभागाकडून सर्वेक्षण करण्यात आल्यानंतर एक-दाेन नव्हे तर तब्बल ६७ जणांविरुद्ध पाेलीस कारवाईचा बडगा उगारण्यात आला हाेता. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर जवळपास १६ डाॅक्टरांना व्यवसाय करण्यास अनुमती देण्यात आली आहे. त्यामध्ये लाेहारा तालुक्यातील नऊ व कळंब तालुक्यातील सात डाॅक्टरांचा समावेश आहे तर सहा प्रकरणे सध्या न्यायालयात आहेत. यातील काही संशयित डाॅक्टरांचा मृत्यू झाला आहे.
‘आराेग्य’कडून सर्वेक्षण...
आराेग्य विभागाकडून प्राथमिक आराेग्य केंद्राच्या माध्यमातून ग्रामीण भागातील संशयित डाॅक्टरांचा शाेध घेतला जाताे. खात्री पटल्यानंतर पाेलीस यंत्रणेच्या उपस्थितीत पंचानामा करून गुन्हा दाखल केला जाताे. तर काहीवेळा ग्रामस्थांकडून तक्रारी आल्यानंतरही कारवाई करण्यात येते.
जिल्ह्यात आजवर आढळून आले संशयित डाॅक्टर
१३१
विनापरवानगा व्यवसाय केल्याप्रकरणी गुन्हा
६७
तालुकानिहाय आढळून आले संशयित डाॅक्टर...
उस्मानाबाद २७
तुळजापूर ०९
उमरगा ३१
लाेहारा २०
कळंब २०
वाशी ०६
भूम ०६
परंडा १२