लोहारा : तालुक्यातील चार ही प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत कुष्ठरोग व क्षयरोग निर्मुलन कार्याक्रमातंर्गत १९ हजार ९०३ कुटूंबातील ९६ हजार ७३७ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात क्षयरोगाचे १३ तर कुष्ठरोगाचे १० रुग्ण आढळले आहेत.
तालुक्यातील कानेगाव, जेवळी,माकणी व आष्टाकासार या चार प्राथमिक आरोग्य केंद्रातंर्गत असलेल्या गावांमध्ये ही कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. हे सर्व्हेक्षण करण्यासाठी तालुक्यात एकूण १०८ पथकांची नेमणूक करण्यात आले आहे. यामध्ये २१६ कर्मचाऱ्यांचा समावेश असून, प्रत्येक गावात जाऊन हे पथक दररोज २० घरांची तपासणी करीत आहे. यात आरोग्य पथकाने रोगाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांचा शोध घेतला व रुग्णांना उपचारासंदर्भात मार्गदर्शन ही केले जात आहे. तसेच या कुष्ठरोग व क्षयरोग आजारासंदर्भात तालुका आरोग्य विभागाकडून जनजागृत्ती केली जात आहे.
तालुक्यातील २२ हजार ५७१ कुटूंबातील १ लाख १६ हजार ७०० नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात असून, आजपर्यत १९ हजार ९०३ कुटूंबातील ९६ हजार ७३७ नागरीकांची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये क्षयरोगाचे २७० संशयित रुग्ण सापडले होते. त्या सर्वाची तपासणी करण्यात आल्यानंतर १३ रुग्णांचे निदान झाले. तसेच तपासणी अवश्यक असलेले संशयित २५७ रुग्ण आहेत. कुष्ठरोगाचे २३० संशयित रुग्ण सापडले होते. यातील १९५ जणांची तपासणी करण्यात आली. यात १० रुग्ण आढळले. तपासणी अवश्यक असलेले ३५ संशयित रुग्ण आहेत. उर्वरित नागरिकांची तपासणी सुरुच असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अशोक कटारे यांनी सांगितले.
चौकट......
कुष्ठरोगाची लक्षणे
अंगावर फिकट लालसर चट्टा उमटणे, चाकाकणारी तेतकट त्वचा होणे, अंगावर गाठी येणे, हातापायांना बधिरता येणे, डोळे पूर्ण बंद न करता येणे, कानाच्या पाळ्या जाड होणे, तळहात व तळपांयावर मुंग्या येणे, तत्वचेवर थंड, गरम संवेदना न जाणवने, हातातील वस्तू गळून पडणे, चालताना पायातील चप्पल गळून पडणे, शारीरिक विकृती अशी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत.
क्षयरोगाची लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला, ताप असणे, भूक मंदवणे, थुंकीवाटे रक्त येणे, शारीरिक वजनात लक्षणीय घट होणे, मानेवर गाठ येणे यासारखी लक्षणे क्षयरुग्णांमध्ये आढळून येतात.
चौकट...
तालुक्यात सुरू असलेल्या तपासणीसाठी एकूण १०८ पथके स्थापन करण्यात आली आहेत. यातील प्रत्येक १ आशा व १ पुरूष स्वंयसेवक यांचा समावेश आहे. आशांद्वारे घरातील स्त्रियांची तपासणी तर पुरूष स्वंयसेवकाद्वारे घरातील पुरूष सदस्यांची तपासणी करण्यात येत आहे.