उस्मानाबाद -उस्मानाबाद पंचायत समितीअंतर्गत राेजगार हमी याेजनेच्या माध्यमातून सहा गावांमध्ये शाेषखड्डे मंजूर झाले हाेते. याच कामात तब्बल १ काेटी १२ लाखांचा अपहार केल्याचे प्राथमिक चाैकशीतून समाेर आले हाेते. अपहारित रक्कम वसूल करण्याचे निर्देश अपहार मुख्य सचिवांनी दिले हाेते. त्यानुसार वसुली सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, याच प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालानुसार आता विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी सहायक गटविकास अधिकाऱ्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील खेड येथील शाेषखड्ड्यांच्या कामात अनियमितता झाल्याची तक्रार विनाेद गरड यांनी केली हाेती. या तक्रारीनंतर पंचायत समितीकडून प्राथमिक चाैकशी करण्यात आली असता, चुकीचे एमआयएस व डीएससीचा गैरवापर करून २० लाख ६७ हजार ६८० रुपयांचा अपहार केल्याचे समाेर आले हाेते. अशाच स्वरूपाची कामे इतर पाच गावांत झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथीलही चाैकशी केली. चाैकशीअंती मेडसिंगा येथील कामात १० लाख ५ हजार रुपये, उपळ्याच्या कामात ३३ लाख १९ हजार, ढाेकी येथे २५ लाख ७५ हजार व बेंबळी येथील कामामध्ये २१ लाख ८८ हजार असा एकूण १ काेटी १२ लाखांचा अपहार झाल्याचे समाेर आले हाेते. यासंबंधीचा सविस्तर अहवाल जिल्हाधिकारी यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला हाेता. या अहवालामध्ये सहायक गटविकास अधिकारी (तत्कालीन प्रभारी गटविकास अधिकारी) सुरेश तायडे यांचे निलंबन करून शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची शिफारस केली हाेती. त्यानुसार विभागीय आयुक्त सुरेश केंद्रेकर यांनी तायडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई केली आहे. याच प्रकरणात यापूर्वी स्थानिक पातळीवरून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवासमाप्तीसह एकाविरुद्ध निलंबनाची कारवाई झाली आहे.
धारणाधिकार तुळजापुरात...सहायक गटविकास अधिकारी तायडे यांच्याविरुद्ध निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी चाैकशीसह कार्यालयीन अभिलेखात फेरफार करू नये, म्हणून त्यांचा धारणाधिकार तुळजापूर पंचायत समिती येथे ठेवण्यात आला आहे. गटविकास अधिकारी यांच्या परवानगीशिवाय मुख्यालय साेडू नये, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.