उस्मानाबाद : चालू वर्षातील गाळप हंगामातील उसाला एफआरपी प्रमाणे दर द्यावा, या मागणीसाठी तालुक्यातील वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने गुरूवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले़
‘शेतकऱ्यांच्या उसाला एफ़आऱपी़ नुसार हमीभाव मिळालाच पाहिजे़ पशुंच्या चाऱ्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट अनुदान जमा केलेच पाहिजे, आमच्या मागण्या मान्य करा, शेतकरी संघटनेचा विजय’ अशा घोषणा देत आंदोलनकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला होता
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिका-यांनी सांगितले की, शेतक-यांना उसाचे बिल हे जिल्ह्यातील व बाहेर जिल्ह्यातील साखर कारखाने १७०० रुपयाप्रमाणे उचल देत आहेत़ परंतु एफआरपीप्रमाणे ही रक्कम २२०० ते २३०० रुपये होते़ शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे एक रक्कमी रक्कम साखर कारखान्यांनकडून मिळाली पाहिजे़ शेतक-यांना उस गेल्यापासून १४ दिवसाच्या आत बिल देण्यात यावे, जिल्ह्यात भीषण दुष्काळ पडल्याने प्रतिहेक्टरी ५ हजार रुपये अनुदान देण्यात यावे अशीही मागणी यावेळी लावून धरली होती़ तसेच कांद्याला प्रतिक्विंटल ५०० रुपये दर देण्यात यावा, उस्मानाबाद, लोहारा तालुक्याचा मंजूर पीक विमा वितरीत करावा, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या़ मागण्या मान्य न झाल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आला
यावेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, धनाजी पेंदे, तानाजी पाटील यांच्यासह वाघोली येथील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते़