उस्मानाबाद : भाजीपाला पिकाला किलोला १० रुपये अनुदान देण्यात यावे, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर टोमॅटो, सिमला मिरची फेकून देऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नापिकी, दुष्काळ, अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडत चालला आहे. असे असतानाही अनेक शेतकरी यंदा तरी उत्पादन चांगले मिळेल, या आशेवर शेती व्यवसाय करीत आहेत. त्यात अनेक शेतकरी भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. मात्र, मागील काही महिन्यांपासून भाजीपाल्यांचे दर घसरले असल्याने शेतकऱ्यांना टोमॅटो, सिमला मिरची बेभाव किमतीत विक्री करावी लागत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लागवडीचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे. तसेच दुधालाही योग्य तो भाव मिळत नसल्याने पशुपालक अडचणीत आले आहेत. शेती व शेतीला जोडधंदा असलेला दुग्धव्यवसाय अडचणीत आला असल्याने शेतकरी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. असे असतानाही केंद्रीय मंत्री व राज्यातील मंत्री या शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देण्याऐवजी राजकारण करण्यात मश्गुल असल्याचा आरोप करीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करीत टोमॅटो, सिमला मिरची जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेकून देऊन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात स्वाभिमानी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, तानाजी पाटील, सचिन उघडे, मारुती दळवी, विष्णू काळे, उमेश चव्हाण, राजेंद्र हाके, गुरू भोजणे, नेताजी जमदाडे, शशी चव्हाण, भाऊसाहेब मुंडे, ओंकार कानडे, आदींचा सहभाग होता. या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.
काय आहेत मागण्या....
सर्व भाजीपाला पिकांना किलोला १० रुपये अनुदान मिळावे.
हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळावी.
दुधाला योग्य दर देण्यात यावा.