लोकमत न्यूज नेटवर्क
भूम : तालुक्यातील कोरोनाबाधितांना उपचार देण्यात ऑक्सिजन पुरवठ्यासह रुग्णालयाला कुठल्याही सुविधा कमी पडणार नाहीत याची दक्षता घ्या, अशा सूचना पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी सोमवारी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
पालकमंत्री गडाख यांनी सोमवारी येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन बेड व इतर सुविधांची माहिती घेतली. यानंतर येथील बेडची पाहणी करुन रुग्णांशी संवाद साधत धीर दिला. यानंतर त्यांनी गोलेगाव येथील कोविड सेंटरला भेट दिली. तेथील वाढती रुग्णसंख्या पाहता, जास्तीत जास्त उपाययोजना करण्याचे आदेश दिले. तसेच बाधित रुग्णांची भेट घेऊन त्यांना वेळेत उपचार व इतर सुविधा मिळतात का, याबाबत माहिती घेतली.
यावेळी खासदार ओम प्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप जोगदंड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे, उपविभागीय अधिकारी मनिषा राशीनकर, तहसीलदार उषाकिरण श्रृंगारे, उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे, गटविकास अधिकारी ढवळशंख यांच्यासह उपजिल्हाप्रमुख दिलीप शाळू, जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश कांबळे, आदी उपस्थित होते.